नवी मुंबई : पोलिसांच्या अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहिमेला मोठे यश आले आहे. घातक मेथॅक्युलोन (आईस रॉक) व केटामाईन पावडर विकणाऱ्या महिलेस सीबीडीमधून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल २१२ ग्रॅम अमली पदार्थाचा साठा जप्त केला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची किंमत १ कोटीपेक्षा जास्त आहे. नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत असल्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांनीही या परिसरात त्यांचे जाळे विस्तारण्यास सुरवात केली आहे. गांजा, एम. डी. पावडरसह अनेक प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री शहरात होवू लागल्याची चर्चा होती. याशिवाय स्पेब ७ सह अनेक औषधांचाही व्यसनांसाठी उपयोग केला जात आहे. हे सर्व प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जूनमध्ये अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केले आहे. गुन्हे शाखेचे उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने विशेष मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत गांजा, एमडी पावडर व इतर अमली पदार्थांची विक्री व सेवनप्रकरणी १६ गुन्हे दाखल झाले असून २१ जणांना अटक केली आहे. शहरामध्ये मेथॅक्युलोन (आईस रॉक) व केटामाईनची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तपास सुरू असतानाच सीबीडी बेलापूर सेक्टर ११ मध्ये एक महिला अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे २५ सप्टेंबरला त्या परिसरामध्ये सापळा रचला होता. अमली पदार्थांची खरेदी करण्यासाठी एका ग्राहकास पाठविण्यात आले. सदर व्यक्तीला अमली पदार्थ विकत असताना शन्नो रमजान शेख या महिलेला अटक केली. तिच्याकडील पिशवीची झडती घेतली असता १२०.२० ग्रॅम मेथॅक्युलोन आईस रॉक व ८५.७० ग्रॅम केटामाईन सापडले. भारतीय बाजारपेठेमध्ये याची किंमत जवळपास ६ लाख असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची किंमत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक माया मोरे, पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, अमित शेलार, ईशान खरोटे, रवींद्र राऊत, कासम पिरजादे, संजयसिंग ठाकूर, मनोज जाधव, अश्विनी चिपळूणकर, सचिन भालेराव, राजेश गाढवे, महेश गवळी, अमोल कर्डीले, अमोर गागरे, सुप्रिया ठाकूर, आकाश मुके व गोपाळ चव्हाण यांचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेथॅक्युलोन व केटामाईन पावडरचा साठा जप्त केला आहे. अटक केलेली महिला अँटॉप हिल झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे. ती मुंबईसह नवी मुंबई, ठाणे परिसरात अमली पदार्थांची तस्करी करत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)मेथॅॅक्युलोन (आईस रॉक)मेथॅक्युलोनचे प्राशन केल्यामुळे तत्काळ गुंगी येते. एक दिवस व त्याहीपेक्षा अधिक काळ त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. आफ्रिकन देशांमधून या मादक पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. रेव्ह पार्टी व इतर ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तरुणांना याचे व्यसन लागले की त्यांना त्यातून बाहेर पडणे अशक्य होत असते. यामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होतो. जादा सेवनामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता आहे.केटामाईनकेटामाईन इतर अमली पदार्थांमध्ये मिसळून त्याचा वापर केला जातो. हेरॉईन, कोकेन व इतर अमली पदार्थांमध्ये मिसळून त्याचे इंजेक्शन घेतले जाते. वेदनाशामक असल्यामुळे पूर्ण शरीर बधिर होते.याचे प्राशन केल्यास त्याचा परिणाम काही दिवस राहात असल्याने यामुळे मेंदू व हृदयावर थेट परिणाम होतो. याच्या सेवनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते. अत्यंत घातक असणाऱ्या केटामाईनचा तरुणाईवर गंभीर परिणाम होत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने मेथॅक्युलोन व केटामाईनचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका महिलेस अटक करून तिचा तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का, सदर महिलेला हा साठा कोणी दिला याचा तपास सुरू आहे. - नितीन कौसडीकर, साहाय्यक आयुक्त, गुन्हे शाखा
मेथॅक्युलोनसह केटामाईन पावडर जप्त
By admin | Published: September 27, 2016 3:16 AM