Join us

मधुमेहामुळे कुत्र्यांमध्ये बळावतोय मोतीबिंदू; शस्त्रक्रिया करून डोळ्यात बसवली जाते ‘लेन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2022 6:57 AM

माणसाप्रमाणेच प्राण्यांच्या आरोग्यासाठी आता अद्ययावत उपचार उपलब्ध झाले असून, विशेषकरून डोळ्यांच्या विकारांसाठी प्राणीप्रेमी संबंधित शस्त्रक्रिया करून घेत आहेत.

संतोष आंधळे मुंबई : तुमच्या पाळीव श्वानांची नजर कमकुवत झाली असेल तर त्याला कदाचित मोतीबिंदू झाल्याची शक्यता आहे. वेळीच उपचार न केल्यास अंधत्व येण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्वानावर शस्त्रकिया करून त्यांची दृष्टी वाचविण्याकडे कल वाढताे आहे. कुत्र्यांमधील वाढता डायबिटीस हा त्यांना अंधुक दिसण्याच्या तक्रारींचे मुख्य कारण आहे. 

माणसाप्रमाणेच प्राण्यांच्या आरोग्यासाठी आता अद्ययावत उपचार उपलब्ध झाले असून, विशेषकरून डोळ्यांच्या विकारांसाठी प्राणीप्रेमी संबंधित शस्त्रक्रिया करून घेत आहेत. प्राण्याच्या डोळ्यांच्या विकारांवर उपचार करणारी अद्ययावत केंद्रे भारतात तुरळक आहेत. चेंबूर येथील ‘द आय वेट’ या केवळ  प्राण्यांच्या डोळ्यांवर उपचार करणाऱ्या केंद्राच्या प्रमुख डॉ. कस्तुरी भडसावळे यांनी सांगितले की, वर्षाला आमच्या दोन्ही केंद्रांवर मिळून डोळ्यांच्या विविध ६०० शस्त्रक्रिया करण्यात येतात. या शस्त्रक्रिया करणाऱ्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने पाळीव  कुत्रे, मांजर, घोडे, पोपट, ससे यांचा समावेश आहे.

येथील केंद्रावर राज्य व परराज्यातून प्राण्यांना डोळ्यांच्या उपचारासाठी आणले जाते.माझे शल्यचिकित्सा विषयातील पदव्युत्तर शिक्षण मुंबईत झाले असले तरी डोळ्यांवरील शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण  मी परदेशात घेऊन  आले आहे. या आमच्या केंद्रावर पशुवैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर शल्यचिकित्सा या विषयाच्या पदवीधर डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाते. परदेशातील डॉक्टर मार्गदर्शन करतात. 

अशी केली जाते मोतीबिंदू शस्त्रक्रिया 

श्वानांची किंवा मांजरांची तपासणी करून मोतीबिंदू झाला आहे की अन्य आजार आहे, याची तपासणी केली जाते. मोतीबिंदू असेल तर शस्त्रक्रियेआधी रक्त तपासणी, ॲनेस्थेशिया फिटनेस घेतला जातो. ऑपरेशन थिएटरमध्ये भुलीचे इंजेक्शन देऊन परदेशी किंवा भारतीय बनावटीची लेन्स शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया झाल्यावर ५-६ वेळा नियमितपणे डॉक्टरांकडे तपासणीसाठी यावे लागत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. आकाश वेदपाठक यांनी सांगितले. 

 आहारशैलीचा दुष्परिणाम 

आपल्या प्रेमापोटी कुत्र्यांना त्यांचे खाद्य सोडून आपण खातो ते अन्न त्यांना दिले जाते. काही ठिकाणी तर दिवाळीचा फराळही खायला दिला जातो. त्यामुळे प्राणी लठ्ठ होतात, परिणामी डायबिटीस होतो. त्यांना अपेक्षित पोषकतत्त्वे मिळत नाहीत.  

टॅग्स :कुत्रा