मेट्रो ट्रॅकवर केटेनरी मेंटेनन्स वाहन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:07 AM2021-05-22T04:07:21+5:302021-05-22T04:07:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे गत वर्ष मेट्रोसाठी आव्हानात्मक होते. मात्र, आता पुन्हा एकदा मेट्रोचे काम वेगाने सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे गत वर्ष मेट्रोसाठी आव्हानात्मक होते. मात्र, आता पुन्हा एकदा मेट्रोचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, मेट्रो ट्रॅकवर केटेनरी मेंटेनन्स वाहन (सीएमव्ही) शुक्रवारी सुरू करण्यात आले असून, चाचणी संपल्यानंतरही ते महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा मेट्राे प्रशासनाने केला. मेट्रो लाइन २ अ वरील केटेनरी ओएचई वायर लाइनच्या दुरुस्तीसह देखभालीसाठी याचा उपयोग केला जाईल. शुक्रवारी याच सीएमव्हीच्या कामाची चाचणी दहिसर मेट्रोदरम्यान घेण्यात आली, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो वेगाने सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आता जोमाने काम करत आहे. मेट्रोच्या चाचण्यांसाठी प्राधिकरणाने कंबर कसली आहे. त्यानुसार मेट्रोची विविध कामे हाती घेण्यात आली असून, आता प्रामुख्याने मेट्रोच्या चाचण्यांवर भर दिला जाणार आहे. तत्पूर्वी, मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी तांत्रिक कामे आणि इतर कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव हे स्वतः कामांवर लक्ष ठेवून आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर सातत्याने ताण येतो. विशेषतः लोकल आणि इतर वाहतुकीची साधने कमी पडतात. परिणामी, मेट्रोसाठी वाहतूकव्यवस्था प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्राधिकरण वेगाने काम करत आहे. याच सगळ्या कामांचा भाग म्हणून मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मेट्रोची कामे जवळपास अंतिम टप्प्यात आली आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून काढण्यात आला आहे.
दरम्यान, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोची कामे वेगाने पूर्ण होत असून, या दोन्ही मेट्रो लाइन येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे.
-----------------
मेट्रो २ अ : दहिसर पूर्व ते डीएन नगर
मेट्रो ७ : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व
................................