मुंबई IIT मध्ये भरला गुरांचा वर्ग, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 02:52 AM2019-07-30T02:52:56+5:302019-07-30T02:53:29+5:30
व्हिडीओ व्हायरल : गुरांना वेसण घालण्यासाठी समितीची फक्त चर्चा
मुंबई : आयआयटी मुंबईत मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी बैलांच्या झुंजीमध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता. तर आता आयआयटीमधील एका वर्गात गाय मोकाट फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने मोकाट जनावरांना वेसण घालण्यासाठी समितीची स्थापना केली खरी; मात्र ही समिती केवळ चर्चा करण्यातच व्यस्त आहे. १५ दिवस उलटूनही या समितीने याविषयी कोणताही तोडगा काढलेला नाही. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरील व्हिडीओच्या सतत्येविषयी आयआयटी मुंबईच्या व्यवस्थापनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे आता व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आयआयटी मुंबईच्या क्लासरूममध्ये एक मोकाट गाय बिनधास्तपणे फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. यापूर्वी १२ जुलैला आयआयटी मुंबईच्या गेट क्रमांक ९ येथे बैलांच्या झुंजीमध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता. त्यानंतर १५ जुलैला पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोकाट जनावरांवर कारवाई हाती घेतली. परंतु आयआयटीमधील कर्मचाºयांनी ही गुरे आयआयटीच्या मालकीची आहेत असा पवित्रा घेत त्याला विरोध केल्याने ही कारवाई थंडावली. दरम्यान, १२ जुलैला घडलेल्या घटनेनंतर आयआयटी मुंबईकडून मोकाट गुरांना वेसण घालण्यासाठी तातडीने विशेष समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती पालिका, सामाजिक संघटना व प्राणी तज्ज्ञांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहे. परंतु ज्या मोकाट गुरांना पकडण्याचे काम पालिका करू शकते, त्याच मोकाट गुरांना वेसण घालण्यासाठी आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून तब्बल १५ दिवस फक्त चर्चेवर घालवण्यात आले आहेत.
च्आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून गेल्या १५ दिवसांपासून पालिका, सामाजिक संघटना व प्राणी तज्ज्ञांसोबत फक्त चर्चा करण्यात येत असून, या चर्चेतून मोकाट गुरांना वेसण घालण्याबाबत कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे मोकाट गुरांना रोखण्यात अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.