मुंबई - देश तोडण्याची भाषा गेल्या पाचेक वर्षांतच का वाढीस लागली व ही भाषा करणार्यात शिकल्या-सवरलेल्या तरुणांचाच का भरणा आहे? हा संशोधनाचा विषय आहे. शर्जील हा ‘जेएनयू’मध्ये ‘पीएचडी’ करीत आहे व आय.आय.टी. मुंबईचा माजी विद्यार्थी आहे. अशा तरुणांच्या डोक्यात हे विष कोण भिनवत आहे, यावरही प्रकाश टाकायला हवा. प्रश्न एका शर्जील किंवा दुसर्या कन्हैया कुमारचा नाही. फुटीरतेची विद्रोही ठिणगी टाकून देशातील तरुणांना अतिरेकी प्रवाहात ढकलण्याचे हे कारस्थान आहे असा आरोप शिवसेनेनं सामना अग्रलेखातून केला आहे.
तसेच शाहीन बागसह देशभरात जे आंदोलन सुरू आहे त्यातील प्रत्येकाने शर्जीलच्या वक्तव्याचा धिक्कार केला व या देशद्रोहय़ाला अटक करा असे सांगितले. त्यामुळे देशाच्या गृहमंत्रालयाने याप्रश्नी राजकारण न करता ही कीड खतम केली पाहिजे. गृहमंत्री अमित शहा जाहीर सभांतून विचारत आहेत की, ‘‘तुम्ही शर्जीलची चित्रफीत पाहिली का? कन्हैया कुमारच्या शब्दांपेक्षा ती अधिक धोकादायक आहे. आसामला हिंदुस्थानपासून तोडण्याची भाषा शर्जीलने केली. मात्र त्याच्या सात पिढ्यांनाही ते शक्य होणार नाही.’’ आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जोरदार वक्तव्याशी सहमत आहोत असं सांगत शिवसेनेने अमित शहा यांची पाठराखण केली आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- देशातील सामाजिक, धार्मिक एकोपा जवळजवळ संपला आहे. मुसलमान आणि हिंदूंत वर्गकलह घडावा, न संपणारे अराजक, नागरी युद्ध चालत राहावे अशाप्रकारचे कारस्थान सुरू आहे. त्यास खतपाणी घालणारे उद्योग ‘राजकीय प्रयोगशाळेत’ चालले आहेत.
- ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्दच नष्ट करणारे हे प्रयोग विद्रोहाच्या ठिणग्या निर्माण करणार असतील तर भविष्य आजच संपले असे मानायला हरकत नाही. शहरी नक्षलवाद आहेच. त्याचबरोबर उच्चभ्रू, उच्च शिक्षितांचा दहशतवाद वाढावा यासाठी राजकारणी विष कालवत असतील तर दुसरे काय होणार!
- एका शर्जीलला आज पकडले. दुसरा शर्जील निर्माण होणार नाही हीदेखील जबाबदारी सरकारची आहे. हिंदुस्थानचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या शर्जील इमाम याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात या शर्जील नावाच्या सापाने जे फूत्कार सोडले त्यामुळे देशभरातील आंदोलनाची बदनामी झाली.
- नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभर निदर्शने, आंदोलने सुरू आहेत, पण या संपूर्ण आंदोलनात कोणीही देशविरोधी वक्तव्ये केली नव्हती. या सर्व आंदोलनांवर ‘टांग’वर करण्याचे काम या शर्जील इमामाने केले. शर्जीलचे भाषण नुसते प्रक्षोभक नव्हते तर देशविरोधी होते.
- ‘चिकन नेक’ म्हणजे कोंबडीची मान ईशान्येकडील राज्यांना हिंदुस्थानशी जोडणार्या 22 किलोमीटरच्या महामार्गाला ‘चिकन नेक’ म्हणून ओळखले जाते. या चिकन नेकची मान कापू पाहणार्या शर्जीलचे हात मुळापासून उखडून चिकन नेकच्या महामार्गावर टांगून ठेवायला हवेत.
- अलिगढ मुस्लिम विद्यापीठात, दिल्ली विद्यापीठातील शाहीनबाग परिसरात या इमामाने हे भाषण केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमानांनी देशभर ‘चक्का जाम’ करण्याची अभद्र भाषाही या तरुणाने केली.
- सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे व शर्जीलच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाला प्रचारासाठी आयतेच कोलीत मिळाले आहे. शर्जीलचे वक्तव्य हे फुटीरतावादी व देशद्रोहीच आहे. दिल्लीत कोणाचेही सरकार असते तरी त्यांना शर्जीलला बेडय़ा ठोकाव्याच लागल्या असत्या. त्यामुळे शर्जीलला अटक करून उधळलेल्या हत्तीस अटक केली या भ्रमातून भगतगणांनी बाहेर पडले पाहिजे.
- देशात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायदा आपले काम करीत असतो. उलट शर्जीलवर तातडीने कारवाई झाली नसती तरच कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. महाराष्ट्रातील ‘एल्गार’प्रकरणी अटक केलेले सगळेच जण समाजातील नामवंत, बुद्धिवंत, विचारवंत आहेत व त्यांच्यावरही शर्जीलप्रमाणेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.