खोकला, थंडी-तापाचे रुग्ण कशामुळे वाढले? रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 10:55 AM2024-03-08T10:55:04+5:302024-03-08T10:56:40+5:30
गेल्या काही दिवसांत शहरातील तापमान झपाट्याने वाढत आहे. दिवसा अति उष्ण, तर रात्री वातावरण चांगलेच थंड असते.
मुंबई : गेल्या काही दिवसांत शहरातील तापमान झपाट्याने वाढत आहे. दिवसा अति उष्ण, तर रात्री वातावरण चांगलेच थंड असते. त्यामुळे नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या काळात व्हायरल (विषाणू) संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये काही प्रमाणात वातावरणात प्रदूषण असल्यामुळे या सर्व गोष्टींचा नागरिकांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम होत आहे. या सगळ्या प्रकारामुळे खोकला, थंडी आणि ताप यांचे मोठ्या संख्यने रुग्ण सध्या शहरात पाहायला मिळत आहेत.
१) या काळात नागरिकांनी स्वतःची प्रतिकारशक्तीचांगली कशी ठेवता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
२) नागरिकांनी जास्त तेलकट, तिखट खाऊ नये.
३) शक्य झाल्यास कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
४) योग्य वेळी डॉक्टरांना दाखवून वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
या काळात वातावरण बदलामुळे या अशा लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे आमच्या रुग्णालयात विशेष करून तापासाठी वेगळी ‘ओपीडी’ आहे. तसेच कान, नाक, घसा विभाग आणि मेडिसिन विभाग या दोन्ही विभागांतील डॉक्टर या लक्षणांच्या रुग्णांना उपचार देत आहेत. काही रुग्णांना २-३ दिवसांत बरे वाटते, तर काही रुग्णांना मात्र आठवडाभर या आजाराचा त्रास होतो. मात्र रुग्णालयात या आजारावर व्यवस्थितपणे उपचार दिले जात असून औषधे दिली जात आहेत.- डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधीक्षक, सर जे. जे. रुग्णालय
कमाल तापमान ३२ अंशांवर :
१) सध्या शहराचे तापमान वाढले असून ते दुपारी ३२ ते ३४ अंशांवर जाते.
२) या उकाड्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. तसेच त्यात प्रदूषण आणि वाहतुकीचा गोंगाट असल्याने नागरिकांमध्ये चिडचिड वाढली आहे.
३) त्यामुळे या गरम वातावरणात आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे.
किमान तापमान १८ अंशांवर - रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत आहे. रात्रीचे तापमान कमी झाले असून १८ अंशांवर आले आहे. या थंड वातावरणामुळे नागरिकांना सर्दीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दिवसा ऊन, रात्री थंडी -
दिवसा उष्णता आणि रात्री गारव्यामुळे शहरात व्हायरल संसर्गाचे प्रमाण वाढले असतानाच आता घसादुखीमुळेही मुंबईकर हैराण झाले आहेत. नाकातून पाणी येणे, घसा दुखणे, गिळताना त्रास होणे, घसा बसणे यासारख्या समस्या त्यांना भेडसावत आहेत.