Join us  

सावधान; तरुण वयात वाढतोय ब्रेन स्ट्रोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:07 AM

ताण तणाव, बदलत्या जीवनशैलीचा दुष्परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ...

ताण तणाव, बदलत्या जीवनशैलीचा दुष्परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे. याशिवाय बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळेही तरुण वयात हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर रुग्णाला गोल्डन अवर म्हणजेच पाच तासांच्या आत उपचार मिळणे गरजेचे असते. वेळीच उपचार न मिळाल्यास जीव जाऊ शकताे.

मे महिना हा जागतिक पक्षाघात जागरूकता महिना (स्ट्रोक) म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने तरुणांमध्ये वाढणाऱ्या या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. सध्या पक्षाघाताचे अनेक रुग्ण आहेत, जे दैनंदिन कामे करण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात. म्हणून पक्षाघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वेळीच लक्ष देऊन उपाय घेणे गरजेचे आहे. बऱ्याच स्ट्रोकच्या रुग्णांना पहिल्या काही महिन्यांत नैराश्य येते. त्या काळात समुपदेशकाची मदत घ्यायला हवी, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.

* वेळीच उपचार घेणे गरजेचे

ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका आता ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित राहिला नसून तरुणांमध्येही या आजाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. जगभरात या आजाराने अनेक तरुणांना जीव गमवावा लागत आहे. पक्षाघातावर वेळीच उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो आणि मृत्यूचा धोकाही टाळता येतो.

- डॉ. विश्वनाथन अय्यर, न्यूरोसर्जन

* १५ टक्के तरुणांना स्ट्रोकचा झटका

ब्रेन हॅमरेज हा ब्रेन स्ट्रोकचाच एक प्रकार आहे. जेव्हा मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या रक्ताचा पुरवठा कमी करू लागतात, तेव्हा ब्रेन स्ट्रोकचा झटका येतो. जेव्हा या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा याला एस्केमिक स्ट्रोक असे म्हणतात. एका सर्वेक्षणानुसार देशात १५ टक्के तरुणांमध्ये एस्केमिक स्ट्रोक हा आजार असल्याचे आढळून येत आहे.

* धोका कोणाला ?

- तरुणपिढीत ज्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या आहे, त्यांना हा त्रास होऊ शकतो.

- हृदयात जन्मतः छेद असल्यास जन्मानंतर काहीच महिन्यात ते बंद करण्यात आले नसेल तर अशांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक असतो.

- ज्यांच्या रक्तवाहिन्या कमकुवत आहेत त्यांनाही हा धोका संभवतो.

- तीव्र डोकेदुखी, मायग्रेनने त्रस्त असणाऱ्यांनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो.

..............................................