मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईच्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. त्यात आता अनलॉक-५ मध्ये बहुतांशी व्यवहार पुर्वपदावर येत आहेत. मात्र या काळात कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी होत आहे. दक्षिण भारतातील चेन्नईमध्ये छोटया समारंभानी कोरोनाचा मोठा फैलाव केल्याचे वृत्त असतानाच मुंबईत अशा प्रकाराचा फैलाव होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: नवरात्रौत्सवात मोठया प्रमाणावर सामाजिक अंतराचे नियम धूळीस मिळाले असून, मास्क परिधान करण्याबाबतही मुंबईकरांकडून निष्काळजीपण बाळगला जात आहे.रविवारी मोनोरेल सुरु झाली. सोमवारी मेट्रो रेल सुरु झाली. बेस्ट तर वेगाने धावत असून, तिच्या मदतीला एसटील आहे. रिक्षा, टॅक्सी व्यतीरिक्त खासगी वाहने रस्त्यावर उतरत आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबई आणखी वेगाने धावू लागली आहे. आता तर नवरात्रौत्सव सुरु झाला असून, गेल्या चार दिवसांत बहुतांश ठिकाणी कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. विशेषत: सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ मंडपात कोरोनाची जनजागृती करून पोस्टर्स लावले म्हणजे नियम पाळले गेले, असे होत नाही. परिणामी प्रत्यक्षात कार्यवाहीची गरज असल्याने नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरती करताना सामाजिक अंतराचा नियम पाळला पाहिजे. सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने वर्दळ वाढली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याबाबत सजग राहिले पाहिजे. नवरात्रौत्सवा व्यतीरिक्त वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. सत्कार समारंभ, सोहळे केले जात आहे. अशा माध्यमातून लोक एकत्र येत आहेत. अशा एका कार्यक्रमात एकास तरी कोरोनाची लागण झालेली असेल तर उर्वरित सदस्यांना याचा फटका बसू शकतो. परिणामी छोटे समारंभ आयोजित करू नका. गर्दी करू नका. कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन सातत्याने मुंबई महापालिका करत आहे.