नागरिकांमधील सतर्कता महत्त्वाची

By admin | Published: April 5, 2015 01:14 AM2015-04-05T01:14:20+5:302015-04-05T01:14:20+5:30

गेल्या काही वर्षांत खासकरून २६/११ च्या घटनेनंतर पोलीस यंत्रणांमध्ये अत्यंत वेगाने बदल होत आहेत. सुरक्षा यंत्रणांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग अधिक वेगवान पद्धतीने होत आहे.

Caution is important among citizens | नागरिकांमधील सतर्कता महत्त्वाची

नागरिकांमधील सतर्कता महत्त्वाची

Next

गेल्या काही वर्षांत खासकरून २६/११ च्या घटनेनंतर पोलीस यंत्रणांमध्ये अत्यंत वेगाने बदल होत आहेत. सुरक्षा यंत्रणांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग अधिक वेगवान पद्धतीने होत आहे. तरी दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याची नितांत गरज आहे. सुरक्षेबद्दलची जाणीव निर्माण होऊन ती वृद्धिंगत होत राहिल्यास त्यामुळे समाज आणि देश सुरक्षित राहू शकतो, असे ठाम प्रतिपादन दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएस चीफ हिमांशू रॉय यांनी केले.

दहशतवादाचे स्वरूप बदलले म्हणजे नेमके कसे?
आज इंटरनेटच्या माध्यमातून जिहादी विचारांचा प्रचार, प्रसार सुरू आहे. जिहादी विचारसरणीच्या गटांचे किंवा अतिरेक्यांचे इंटरनेट चॅट रूम्स आहेत. त्या माध्यमातून एकाचवेळी अनेक तरुणांवर जिहादी विचार बिंबवले जात आहेत. मोबाइलवरील इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे कधीही, कुठेही हवे ते पाहायला, ऐकायला, वाचायला मिळते आहे. यामुळे घरबसल्या तरुण जिहादी विचारांकडे आकर्षित होत आहेत. गंभीर बाब ही की जिहादी विचारांचा प्रचार, प्रसार कुठे, किती प्रमाणात झालाय, हे शोधायला मार्ग नाही. यातूनच संघटनात्मक कारवायांपेक्षा माथी भडकलेल्यांकडून स्वतंत्रपणे होऊ घातलेल्या दहशतवादी, घातपाती कारवायांचा धोका भविष्यात जास्त संभवतो. अंधेरी-सीप्झमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगारावर काम करणाऱ्या अनिस अन्सारी या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाने वांद्रे-कुर्ला संकुलातल्या अमेरिकन शाळेवर हल्ला करण्याचा आखलेला कट एटीएसने उधळला. अनिस अशाच चॅटरूममधून जिहादी बनला आणि बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेऊ इच्छित होता. अशाप्रकारचे एकांगी हल्ले भविष्यात घातक ठरू शकतात.
सायबरसोबत फोफावलेल्या दहशतवादाला एटीएसचे उत्तर काय?
एटीएसकडे अद्ययावत सायबर लॅब आहे. यातून जिहादी विचारांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या साइट्स, सोशल मीडिया, चॅटरूम्सवर करडी नजर ठेवली जाते. कोणत्या साइटवर जास्त हिट्स आहेत, त्यांचे सुरू असलेले संभाषण मॉनिटर केले जाते. धोकादायक मजकूर, वेबपेज, पोस्ट ब्लॉक केल्या जातात. अनिस अन्सारीच्या हालचालींची माहितीही याच पद्धतीने मिळाली. योग्यवेळी त्याला अटक करून संभाव्य हल्ला उधळण्यात एटीएसला यश मिळाले. याशिवाय देशपातळीवर ‘सर्ट’ (कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) संस्था कार्यरत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून देशात येऊ घातलेला प्रत्येक आक्षेपार्ह मजकूर ही संस्था ब्लॉक करते.
एटीएसकडून आणखी काय प्रयत्न होत आहेत ?
खरे म्हणजे शिक्षण हे दहशतवादावर परिणामकारक औषध आहे. शिक्षण, जनजागृतीतून जिहादी विचारांकडे आकर्षित झालेल्यांना मूळ प्रवाहात आणणे आवश्यक आहे. याशिवाय अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले फायदे मिळायला हवेत. नोकरीच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. मदरशांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. तिथल्या अभ्यासक्रमात बदल आवश्यक आहेत, की जे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून देतील. मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. शासनाच्या सर्वच विभागांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी यांची एकत्र बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. महाराष्ट्रातल्या १७२ शाळा-महाविद्यालयांमधील सुमारे ४१ हजार विद्यार्थ्यांशी एटीएसने संवाद साधून दहशतवाद, सायबर दहशतवादाबाबत जनजागृती केली. यापुढेही हा उपक्रम निरंतर सुरू राहणार आहे.
इसिसमुळे देशात रुजलेल्या दहशतवादावर काय परिणाम झाला?
एका भूभागावर राज्य निर्माण करणारी, प्रशासकीय व्यवस्था उभी करणारी इसिस ही दहशतवादाच्या इतिहासातली पहिलीच संघटना असावी. त्यामुळे इसिसच्या भूमिकेकडे जगभरातले तरुण आकर्षित झाले, मात्र भारतात इसिसची लाट थंडावली. जर्मनी, फ्रान्स, अफगाणिस्तानसारख्या देशांच्या तुलनेत भारतातून इसिसला फारच कमी प्रतिसाद मिळाला, ही आनंदाची बाब आहे. पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम समाज भारतात राहतो. काही टाळकी सोडली तर उर्वरित समाज शांतताप्रिय, सहिष्णू आहे ही जमेची बाब आहे.
कल्याणमधून चार तरुण इसिसच्या दहशतवादात सहभागी झाले. मुंबई किंवा राज्यातून अशा आणखी घटना घडल्या?
नाही, मात्र अशा घटना घडू नयेत, यासाठी एटीएसची धडपड सुरू आहे. १८ ते २५ वयोगटातील हरवलेल्या, नोकरीनिमित्त परदेशात विशेषत: अफगाणिस्तान, इराक किंवा आसपासच्या देशांमध्ये असल्यास त्यांच्याबाबत चौकशीची मोहीम उघडली आहे. त्यांचे घर गाठून, पालकांशी चर्चा केली जात आहे. हे तरुण पालकांच्या संपर्कात आहेत का, हे पडताळले जात आहे.
कल्याणचे तरुण इसिसच्या संपर्कात आहेत, हे त्यांच्या पालकांना माहीत नव्हते?
हो, हे खरे आहे. कालांतराने ही माहिती त्यांना मिळाली. आपल्या मुलांची संगत, त्यांच्या हालचाली, वागण्या-बोलण्यात झालेला फरक याबाबत पालकांनी जागरूक राहणे आजच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचे आहे. हे संकेत ओळखल्यास पुढला अनर्थ टळू शकेल.
सर्वसामान्यांची भूमिका काय असायला हवी?
दहशतवादाविरोधातल्या लढ्यात सर्वसामान्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येकानेच सतर्क राहायला हवे. आसपास घडणारी अनपेक्षित गोष्ट, घटना, घडमोडी ओळखून त्याबाबत पोलिसांना माहिती देणे अपेक्षित आहे. मुंबईत ही सतर्कता सातत्याने जाणवते. सुरक्षिततेसंदर्भातील जागरूकता सातत्याने ठेवायला हवी. यामुळेच समाज, देश सुरक्षित राहील.
इंडियन मुजाहिद्दीनमध्येही फूट पडल्याची चर्चा आहे?
हो, तशी माहिती एटीएसला आहे. पाकिस्तान, आयएसआयवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढला. त्यामुळे आयएसआयने इंडियन मुजाहिद्दीनला भारतातल्या कारवायांचा वेग कमी करण्यास बजावले. हे आदेश काहींनी मानले, तर काही मानायला तयार नव्हते. त्यातून फाटाफूट झाली, अशी माहिती एटीएसपर्यंत आली आहे. मुळात इंडियन मुजाहिद्दीनचे कंबरडे देशातल्या सुरक्षा यंत्रणांनी एक होऊन मोडले. याचा अर्थ भविष्यात या संघटनेकडून धोका नाही, असे नाही. मनुष्यबळ उभे करण्यापासून सर्वच घडी या संघटनांना नव्याने बसवावी लागेल.

बदललेला दहशतवाद, इसिसची साथ, या साथीतून बचावलेला भारत, दहशतवादाशी दोनहात करताना पोलीस यंत्रणांसोबत शासन व सर्वसामान्यांची भूमिका आणि दहशतवाद रोखण्यासाठी व त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर सुरू असलेली धडपड या महत्त्वाच्या विषयांना रॉय यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफीटेबल’ कार्यक्रमात सविस्तर माहिती विशद केली.

गुप्तहेर संघटना किंवा अन्य माध्यमांतून मिळालेल्या प्रत्येक माहितीची शहानिशा करणे क्रमप्राप्त आहे. या कवायतीमुळे आमची सज्जता सिद्ध होते. मुळात २६/११च्या हल्ल्यानंतर गुप्तहेर संघटना, त्या त्या राज्यांमधल्या एटीएस, एसटीएफ, स्पेशल सेलचे वरिष्ठ अधिकारी महिन्याकाठी एकदा एकत्र येतात. प्रत्येक जण आपल्याकडील माहिती सर्वांसमोर ठेवतो. या माहितीला अन्य अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळतो किंवा माहितीची पुढली साखळी समोर येते. अशाच पद्धतीने एकेक ठिपके जोडत अखेरीस आकार तयार होतो. दहशतवादाशी दोन हात करताना केंद्रीय गुप्तहेर संघटना मोलाची भूमिका बजावत असते. केंद्रीय संस्था या राज्यांसाठी बिग ब्रदरचीच भूमिका बजावत असतात. पण इंटेलिजन्स शेअरिंग वाढल्याने माहितीची पडताळणी वेगाने होत आहे.

 

Web Title: Caution is important among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.