Join us

सावधान; ५० हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:06 AM

काेराेना संसर्गाची स्थिती नियंत्रणात; मृत्यूचे प्रमाण मात्र चिंतेचा विषयलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावाची स्थिती नियंत्रणात ...

काेराेना संसर्गाची स्थिती नियंत्रणात; मृत्यूचे प्रमाण मात्र चिंतेचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरीकडे मृत्युदर हा चिंतेचा विषय आहे. शहर, उपनगरातील दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या एकूण बळींमध्ये ८६ टक्के मृत्यू हे ५० हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांचे आहेत.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ५० हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.६ टक्के आहे. सध्या मुंबईत ४.३९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर माॅनिटरिंग करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची आहे. कोविड-१९ मुळे आतापर्यंत १४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ३० ते ५० या वयोगटात अधिक असल्याचे गेल्या वर्षभरात दिसून आले आहे. मात्र ६० ते ६९ या वयोगटात एकूण मृत्यूंच्या प्रमाणात २७ टक्के मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत या वयोगटातील ३,९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बळींमध्ये ८६ टक्के मृत्यू हे ५० हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांचे आहेत.

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले होते. सुरुवातीच्या काळात विलगीकरणाच्या भीतीने तसेच या आजाराबाबत पुरेशी माहिती नसल्याने रुग्ण वेळेत उपचार घेत नव्हते. मात्र महापालिकेने कोविड मृत्यूमागचे कारण शोधून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. त्याचे चांगले परिणाम दिसून येत मृतांचा आकडा नियंत्रणात आला. सध्या मुंबईतील आतापर्यंतचा सरासरी मृत्युदर दोन टक्के आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मृतांमध्ये ६० ते ६९ या वयोगटात सर्वाधिक मृत्यू दिसून आले आहेत. त्यापाठोपाठ ७० ते ७९ या वयोगटात ३,३३७ मृत्यू तर ५० ते ५९ या वयोगटात ३,००८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

* कोरोना टास्क फोर्सच्या मदतीने प्रयत्न सुरू

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईतील मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना टास्क फोर्सच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय, गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना अतिजोखमीचे आजार असतात, त्यामुळे विलगीकरणात अचानक आक्सिजनची पातळी खालावल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. परिणामी, अशा रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

...................................