Join us

खबरदारी बाळगायलाच हवी; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापराच, टास्क फोर्सची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 6:31 AM

आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

मुंबई : राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये  वाढ दिसत आहे. कोरोनाचा स्फोट पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी ही बाळगायलाच हवी. त्यासाठी मास्कचा वापर करायला हवा असे मत टास्क फोर्स तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. मास्क घालणे ऐच्छिक असले, तरी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सिनेमागृहे, सभागृहे, कार्यालयांमधील बंदिस्त ठिकाणी, तसेच सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणे आवश्यक आहे. त्याच वेळी, कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याने ती वाढवावी. हे प्रमाण सध्या असलेल्या चाचण्यांपेक्षा दुप्पट करावे, अशा सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, वाढत्या कोरोना संसर्गावर तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष आहे. वाढता संसर्ग आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यात गर्भवती, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. याखेरीज, कोरोना गेला ही मानसिकता बदलून मास्कचा वापर, गर्दीत वावर कमी, स्वच्छतेचे निकष आणि शारीरिक अंतर हे नियम पाळले पाहिजेत. शिवाय, लसीकरणाकडे दुर्लक्ष न करता वर्धक मात्रासुद्धा घेतली पाहिजे.

लसीकरणाचा वेग खाली आला असून, त्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. राज्य हे सर्व गटांमध्ये लसीकरणाच्या बाबतीत सरासरीपेक्षा खाली आहे. नवीन रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर कोरोनाव्यतिरिक्त इतर  सुविधा सुरू ठेवण्यासाठी योजना तयार ठेवणे तसेच त्वरित प्रतिक्रिया म्हणून सरकारी रुग्णालयांना कोरोना रुग्णालयांमध्ये बदलू नये.  रुग्णांची संख्या कमी राहील, अशी शक्यता असल्याने विशिष्ट रुग्णालयांमध्ये रुग्णांना एकत्र करता येईल का यादृष्टीने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. रुग्णालयामध्ये इलेक्ट्रिक व फायर ऑडिटच्या वेळी सांगितल्या गेलेल्या कामांसाठी डीपीडीसी किंवा इतर स्थानिक स्रोतांमधून निधी उपलब्ध करून द्यावा, असेही निर्देश दिले आहेत.

‘...तर मास्क सक्तीचा निर्णय घ्यावा लागेल’ 

कोरोनाचे रुग्ण सध्या वाढायला लागले आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचे कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील जनता दरबार कार्यक्रमानंतर पवार म्हणाले की, सध्या वाढत असलेल्या संख्येवर राज्य सरकार व सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. दर आठवड्याला कोरोना स्थितीबाबत आरोग्य विभागाचे सचिव मंत्रिमंडळाला अद्ययावत माहिती देत असतात. रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे संख्येवर लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार