सावधान; स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली होते फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:10+5:302021-05-05T04:09:10+5:30

कोट्यवधीचा गंडा; राज्यभरातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या मुकेश सूर्यवंशीला अटक (धंदा ठगीचा - भाग १) लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

Caution; There was fraud in the name of giving cheap gold | सावधान; स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली होते फसवणूक

सावधान; स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली होते फसवणूक

googlenewsNext

कोट्यवधीचा गंडा; राज्यभरातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या मुकेश सूर्यवंशीला अटक

(धंदा ठगीचा - भाग १)

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील शेतकरी, मोलकरणींसह उच्चशिक्षितांनाही कोट्यवधींचा गंडा घालणारा मुकेश सूर्यवंशी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मुंबईसह राज्यभरात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत.

मुकेशने घाटकोपर तसेच वेगवगेळ्या ठिकाणी सुरू केलेल्या कंपन्याही बोगस असून दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात समाेर आले आहे. खार आणि सांताक्रुझ पोलीस ठाण्यात याचप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

मुकेशने स्वस्तात सोने खरेदी-विक्रीच्या नावाखाली ठगीचा धंदा सुरू केला. जास्तीचा नफा मिळणार असल्यामुळे अनेकांनी गुंतवणूक केली. कॅनडा येथे नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये एजंट म्हणून कार्यरत असलेले सत्यानंद गायतोंडे (५३) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचीही यात फसवणूक झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसरमध्ये त्यांचा फ्लॅट असल्याने ते अधूनमधून मुंबईत ये-जा करतात. २०१३ मध्ये मढ येथे एका सिनेमाच्या सेटवर त्यांची मुकेशसोबत ओळख झाली. त्याने मसाल्याचा व्यवसाय असून जे. जे. स्पाईसेस नावाची कंपनी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फेसबुक, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून दाेघांमध्ये संवाद सुरू झाला.

२०१६ मध्ये तेे मुंबईत आल्यानंतर मुकेशने त्यांच्याशी संपर्क साधला. मौर्या स्विस नावाची कंपनी उघडली असून त्यात, बाजारभावापेक्षा १० टक्के कमी दराने सोने आणि त्याची पावती देणार असल्याचे सांगितले. हे सोने बाहेर विकल्यास जास्तीचा नफा मिळेल, असे आमिषही दाखवले. मात्र गायाताेंडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ते कॅनडाला निघून गेले.

२०१८ मध्ये कामानिमित्त ते पुन्हा मुंबईत आल्यानंतर मुकेशने त्यांची भेट घेतली. बंगलोरमध्ये सोन्याचा व्यवसाय करण्यासाठी मदत मागितली. मुकेश ओळखीचा असल्याने त्यांनी मदत केली. त्यानंतर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान गायतोंडे यांनीही १५ लाख ६२ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्या कुटुंबीयांनीही पैसे गुंतविले. पैसे देऊनही सोने न मिळाल्यामुळे त्यांनी मुकेशकडे विचारणा केली. ताे टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र ताेपर्यंत मुकेश पसार झाला हाेता.

* मुंबईत फसवणुकीनंतर दुबईवारी

- मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात फसवणूक केल्यानंतर २०१९ मध्ये मुकेश दुबईला पसार झाला. त्याच्या पासपोर्ट जप्तीचे आदेश असतानाही तो पसार होण्यात यशस्वी झाला होता. गायतोंडे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मुकेशबाबतचा व्हिडिओही दुबईत व्हायरल केला.

- फसवणूक झाल्यानंतर गायतोंडे यांनी २०१९ मध्ये मुंबई पोलीस दलातील एका सहआयुक्तांची भेट घेतली. मात्र, त्यांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी सध्या एटीएसमध्ये कार्यरत एका अधिकाऱ्याला भेटा, ते मदत करतील असे सांगितले. त्या अधिकाऱ्यानेही असेच २५ दिवस घालवले. पुढे त्यांनी खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तेव्हाही तपास अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्यामुळे मुकेश पसार होण्यास यशस्वी झाला, असा आरोप गायताेंडे यांनी केला. मात्र तीन वर्षांनंतर मुकेश भारतात परत येणार असल्याचे समजताच महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे ताे पाेलिसांच्या जाळ्यात अडकल्याचेहह त्यांनी नमूद केले.

* अशी केली अटक

मुकेश भारतात येणार असल्याची माहिती गायतोंडे यांना मिळताच त्यांनी याबाबत महाराष्ट्र पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, तपासाअंती त्याला गोवा विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. तेथून पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेत तेथे याचप्रकरणी दाखल गुन्ह्यांत अटक केली. त्यानंतर खार आणि त्यापाठोपाठ सांताक्रूझ पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

* हजारो लोकांची फसवणूक केल्याचा संशय

मुकेशने गुजरातमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक केल्याची माहितीही समोर येत आहे. दरम्यान, त्याने आतापर्यंत हजारो लोकांची फसवणूक केल्याची शक्यता गायतोंडे यांनी वर्तवली असून पाेलीस तपास सुरू आहे.

..................................................

Web Title: Caution; There was fraud in the name of giving cheap gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.