लोकल प्रवास सुरू : हॉटेल, रेस्टाॅरंटही रात्री साडेदहापर्यंत खुली; माॅललाही परवानगी
मुंबई : राज्यभरात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी रविवारी मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व मॉल सुरू झाले. मात्र ग्राहकांचे प्रमाण तुलनेने कमी होते. कारण मॉलमधील प्रवेशासाठी लसीच्या दोन मात्रा बंधनकारक असून, तेवढ्या वेगाने लसीकरण झालेले नाही. हॉटेल, रेस्टाॅरंट आणि लोकल प्रवासाबाबतही काहीसे असे चित्र पाहायला मिळाले. अटीशर्थींसह देण्यात आलेल्या निर्बंध मुक्तीची मुंबईत सावध सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले.
मॉलमधील देखभाल दुरुस्ती असो, कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस असो, सामाजिक अंतर असो; असे प्रत्येक नियम पाळण्यावर मॉलचा भर आहे. विशेषत: सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम, अटींच्या अधीन राहून मॉलमधील कामकाज केले जात आहे. अजून अपेक्षित ग्राहक नसले तरी काही दिवसात इथली उलाढाल पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.