मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने ही दुसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. परिणामी, याविषयी खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी दिला. एकीकडे लसीकरण प्रक्रिया सुरू असली तरीही कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन संसर्गाचा मार्ग ठरू शकते, असा इशाराही टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
मागील ४-५ दिवसांत काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या १५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. परिस्थिती दिवसागणिक चिंता वाढवत आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता यंत्रणांनी आरोग्य सेवासुविधा सज्ज ठेवायला हव्यात. नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दुहेरी मास्कचा वापर अधिक लाभदायक असल्याचे स्पष्ट केले. गर्दीच्या ठिकाणी तसेच प्रवासामध्ये, सार्वजनिक ठिकाणी मास्कमुळे संरक्षण मिळते. कॉटनच्या कापडाचे दोन मास्क एकमेकांवर लावले तर या मास्कमुळेही संरक्षण मिळू शकते. गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका टाळण्यासाठी दुहेरी मास्क लावणे अधिक आरोग्यदायी असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. कापडाचे मास्क सुरक्षित असले तरीही ते वेळोवेळी धुवायला हवेत; अन्यथा त्वचेवर ॲलर्जीमुळे चट्टे, पुरळ उठू शकतात. उन्हाळ्यात घाम अधिक आल्यामुळे चेहऱ्यावरचा घाम मास्कमध्ये झिरपून त्याचीही ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे बाहेर प्रवास करत असाल तर मास्कचे दोन जोड सोबत ठेवावेत व गरजेनुसार ते बदलावेत, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
डॉ. राहुल पंडित यांनी सामान्य नागरिकांच्या कोरोनाविषयी मानसिकतेमुळे विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निरीक्षण मांडले. मास्क न घालता, स्वच्छता न बाळगता इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या नागरिकांच्या मनोवृत्तीमुळेही रुग्णवाढ हाेत आहे. कोरोनाविषयक नियम गांभीर्याने घेतले जात नाहीत. उपाहारगृहे, हाॅटेल्स, मंगल कार्यालये, अशी विविध ठिकाणे कोरोना संसर्गाचे प्रमुख मध्यम ठरत आहेत, असे डाॅक्टरांनी स्पष्ट केले.
लसीकरणानंतर दाेन महिने काळजी घेणे गरजेचे- तर डॉ. शिवकुमारे उत्तुरे यांनी सांगितले की, कोरोना लसीकरण वाढले, तसे लोकही बिनधास्त घराबाहेर पडू लागले आहेत; पण लस घेतल्यानंतरही कोरोनाचे नियम पाळावेच लागतील. - लसीचा परिणाम लगेच सुरू होत नाही. शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे लसीकरणानंतर दोन महिने काळजी घेणे गरजेचे आहे.