वृद्धाच्या पोटातून काढली कवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:16 AM2018-06-01T01:16:35+5:302018-06-01T01:16:35+5:30
मुंबईत राहणारऱ्या ६५ वर्षीय अहमद खान यांनी दोन दिवसांपूर्वी चुकून प्लास्टीकची कवळी गिळली होती.
मुंबई : मुंबईत राहणारऱ्या ६५ वर्षीय अहमद खान यांनी दोन दिवसांपूर्वी चुकून प्लास्टीकची कवळी गिळली होती. चेंबूर येथील रुग्णालयात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर यांच्या पथकाने थोरॅसिस आॅन्को सर्जन डॉ. तन्वीर मजीद यांच्या मदतीने अत्यंत गुंतागुंतीची व कठीण एसोफॅगोटमी शस्त्रक्रिया करून प्लास्टिकची कवळी अखेर बाहेर काढली.
छाती आणि पोटाच्या वरील भागात असह्य वेदना होत असल्याची तक्रार घेऊन खान रुग्णालयात आले होते. कवळी नेमकी कुठे आहे हे बघण्यासाठी एक्स-रे काढण्यात आला पण ती प्लास्टिकची असल्याने एक्स-रेमध्ये दिसत नव्हती. मग छाती व पोटाचा सीटीस्कॅन करून कवळी नेमकी कोठे आहे ते शोधण्यात आले. सहा सेंटीमीटरच्या या कवळीने अन्ननलिका व्यापून टाकल्याने ६५ वर्षीय रुग्णाला गिळणे व श्वास घेणे कठीण जात होते. कवळी एण्डोस्कोपीच्या माध्यमातून काढण्यासाठी तीन वेळा प्रयत्न करण्यात आले पण त्यात यश आले नव्हते.
थोरिअॅक आॅन्कोसर्जन डॉ. तन्वीर मजीद म्हणाले, रुग्णाची परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती. कारण, त्यांचे वय जास्त होते आणि दुसºया रुग्णालयात कवळी काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. रुग्णाला धूम्रपानाची सवय असल्याने भूल देणे कठीण होते. त्याप्रमाणे अन्ननलिका कापण्यातही मोठा धोका असतो. ती आतल्या आत गळू शकते. त्यात रुग्ण या घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतर आला होता. मात्र, तज्ज्ञांच्या पथकाने त्यांची अन्ननलिका कापून ती पुन्हा जोडून दिली. त्यांच्यावर एसोफॅगोटमी शस्त्रक्रिया करून अन्ननलिका व्यापणारी बाहेरची वस्तू तेथून काढली. डॉ. रॉय पाटणकर पुढे म्हणाले, या रुग्णाने कवळी गिळली होती आणि त्याचा परिणाम उत्तर अन्ननलिकेतील सर्वांत अरुंद भागावर झाला होता. रुग्णाने झोपेत कवळी गिळली होती. त्या कवळीचे आकारमान अन्ननलिकेच्या आकारमानाच्या तिप्पट होते. अशा परिस्थितीत नीट पकड मिळत नसेल, तर अन्ननलिका उघडून बाहेरील वस्तू काढणे व नंतर अन्ननलिका पुन्हा जोडणे याखेरीज दुसरा पर्याय राहत नाही. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी रुग्णाला नाकाद्वारे पोटापर्यंत घातलेल्या नलिकेद्वारे द्रव आहार देण्यात आला. शस्त्रक्रियेची जखम पूर्ण बरी झाली असल्याची खात्री करण्यासाठी विशेष तपासणी करण्यात आली आणि मग रुग्णाला तोंडावाटे अन्न घेण्याची परवानगी देण्यात आली. आता रुग्णाची प्रकृती उत्तम असून ते तोंडावाटेच अन्न घेत आहेत.