Join us

एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठीच एजन्सी काम करतात; राणेंचा भाजपावर प्रहार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 2:09 PM

ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था विरोध पक्षांना टार्गेट करत असल्याच्या मुद्द्यावरूनही त्य़ांनी भाजपावर प्रहार केला आहे.

मुंबईः महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा भाजपाला अल्टिमेटम दिला आहे. तसेच ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था विरोध पक्षांना टार्गेट करत असल्याच्या मुद्द्यावरूनही त्य़ांनी भाजपावर प्रहार केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राणेंनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.  राणे म्हणाले, एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं असल्यास यासाठी काही एजन्सी काम करत आहेत, मी त्या एजन्सीच्या म्होरक्यांना पकडलं आहे. त्यांना मी विचारलं की असं का करताय, तेव्हा त्यांनी काही जणांच्या आदेशावरून असं करावं लागतं, असं सांगितलं.अशी सात एक लोकांची टीम आहे. त्यात काही वकील आहेत, काही सीए आहेत. भुजबळांचाही त्याच टीमनं बळी घेण्याचा प्रयत्न केला होता. ती टीम कसं काम करते आणि ते विरोधकांना कसे ब्लॅकमेल करतात हे वेळ आल्यावर सांगेन, असंही राणे म्हणाले आहेत. ते खरं तर कोणासाठी काम करतात की, पैशासाठी काम करतात हे मी सांगू शकत नाहीत. नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी काम करत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.तसेच भाजपासोबत राहणार की नाही याचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेणार असल्याचंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. अमित शाहांनी पक्ष प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आता देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे. येणाऱ्या 10 दिवसांत सर्व निर्णय घेईन, 10 दिवसांनंतर मी भाजपात जाणार की स्वतःच्या पक्ष चालवायचा हे ठरवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. भाजपानं दिलेली आश्वासनं 10 दिवसांत पूर्ण होतील, अशी आशा आहे. निर्णय घ्यायचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही सूचक विधान राणेंनी केलं आहे.   

टॅग्स :नारायण राणे