अनिल देशमुख यांना सीबीआयने विचारले सुमारे ४० प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:05 AM2021-04-15T04:05:39+5:302021-04-15T04:05:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दरमहा मुंबईतून १०० कोटी हप्ता वसूल करण्याच्या आरोपाबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख ...

CBI asked Anil Deshmukh about 40 questions | अनिल देशमुख यांना सीबीआयने विचारले सुमारे ४० प्रश्न

अनिल देशमुख यांना सीबीआयने विचारले सुमारे ४० प्रश्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दरमहा मुंबईतून १०० कोटी हप्ता वसूल करण्याच्या आरोपाबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) बुधवारी कसून चौकशी केली. जवळपास आठ तासांहून अधिक काळ त्यांच्याकडे सखोल विचारणा करण्यात आली असून, आराेपांच्या अनुषंगाने सुमारे ४० प्रश्न त्यांना विचारण्यात आल्याचे समजते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना टाळून एपीआय सचिन वाझेलाच रिपोर्टिंगसाठी का बोलविले जात होते, त्यासाठी कोणी सांगितले होते, याबद्दल त्यांचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयचे पथक गेल्या ९ दिवसांपासून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करत आहे. सोमवारी माजी गृहमंत्री देशमुख यांना १४ एप्रिलला जबाब नोंदविण्यासाठी हजर रहाण्याबाबत सूचना करण्यात आली होती.

त्यानुसार देशमुख हे बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास कलिना येथील डीआयडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये हजर झाले. सीबीआयचे नूतन विशेष महानिरीक्षक ज्ञानेंद्र वर्मा यांच्या सूचनेनुसार अधीक्षक विक्रम कलाले व अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. कोणकोणते अधिकारी ब्रीफिंग करण्यासाठी येत होते, त्यासाठीचा प्रोटोकॉल काय होता, सचिन वाझेलाच का बोलाविले जात होते, परमबीर सिंग यांनी त्याबाबत केलेले आरोप, वाझेने एनआयएच्या न्यायालयात सादर केलेले पत्रातील आरोप, अन्य पोलीस अधिकारी व त्यांचे खासगी सचिव आणि सहायकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. सुमारे ४० प्रश्न विचारुन प्रत्येक प्रश्नावर सविस्तर जबाब नोंदविण्यात आला. सीबीआय याप्रकरणी सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल आपल्या निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करणार आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी सचिन वाझेला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार गेल्या मंगळवारपासून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आतापर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि सहायक आयुक्त संजय पाटील तसेच एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझेचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला आहे.

...........................

Web Title: CBI asked Anil Deshmukh about 40 questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.