Join us

आर्यनला उचलणारे वानखेडेच अडकले, सीबीआयचा आरोप; अटक न करण्यासाठी २५ कोटी मागितले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 5:16 AM

मुंबई, दिल्ली, रांचीसह २९ ठिकाणी छापेमारी

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा ठपका ठेवत सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अन्य दोन अधिकारी, या प्रकरणातील पंच किरण गोसावी आणि अन्य काही जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली  शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वानखेडे यांच्या मुंबईतील ओशिवरा येथील निवासस्थानासह दिल्ली, रांची, कानपूर, लखनौ, गुवाहाटी, चेन्नई अशा २९ ठिकाणी छापेमारी केली आहे. 

आर्यन खान प्रकरणात लाचखोरी झाल्याचा तपास करण्यासाठी एनसीबीने सीबीआयला पत्र लिहिले होते. प्राथमिक पडताळणी झाल्यानंतर शुक्रवारी सीबीआयने छापेमारी करत वानखेडे, एनसीबीतील तत्कालीन अधीक्षक विश्वविजय सिंह, गुप्तचर अधिकारी आशीष रंजन, आर्यन खानच्या अटकेनंतर त्याच्यासोबतचा फोटो व्हायरल करणारा आणि या प्रकरणातील पंच किरण गोसावी व अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी अधीक्षक विश्वविजय सिंह याला अलीकडेच बडतर्फ करण्यात आले आहे.

प्रकरण काय?

एनसीबीच्या मुंबईतील विभागीय संचालकपदी असताना समीर वानखेडे यांनी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डिलिया क्रूझवर छापेमारी केली होती.

क्रूझवरून अमली पदार्थांचा साठा जप्त करतानाच क्रूझवर जाणाऱ्या आर्यन यालाही अटक केली होती.

आर्यनला अटक न करण्यासाठी वानखेडे आणि त्यांच्या पथकाने २५ कोटींची लाच मागितल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.

क्रूझवरील कारवाईनंतर समीर वानखेडे हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

आर्यन प्रकरणातही त्यांनी अनेक प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर होता.

या प्रकरणी त्यांच्यासह एनसीबीच्या सात अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली होती.

यानंतर एनसीबीने सीबीआयला पत्र लिहून वानखेडे व त्यांच्या पथकातील लोकांची भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यास सांगितले होते.

 क्रूझ प्रकरणी आर्यन खान याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मे २०२२ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता केली होती.