मुंबई : दरमहा १०० कोटी रुपये वसुलीच्या टार्गेट दिल्याच्या आरोपाबाबत प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्व संबधितांकडे पहिल्या टप्प्यात चौकशी पूर्ण केली. त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांच्या जाबजबाबाची शहानिशा केली जात आहे. आवश्यकता वाटल्यास त्यांच्याकडे पुन्हा विचारणा केली जाणार आहे.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांचेही जबाब नोंदविले आहेत. त्याशिवाय निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेची चौकशी केली आहे. त्यामुळे सर्व संबंधित साक्षीदारांचे जबाब पूर्ण झाले आहेत. त्यांच्या जबाबाची सुसंगती जोडली जात आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने मंगळवारपासून हप्ता वसुलीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. याचिकाकर्ती जयश्री पाटील यांच्याकडून रीतसर तक्रार नोंदवून घेण्यात आली.
‘त्या’ डायरीच्या नोंदीची झाडाझडतीसचिन वाझे आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने करीत असलेल्या हप्ता वसुलीची नोंद असलेली डायरी एनआयएने ताब्यात घेतलेली आहे. त्याची पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनिल देशमुख यांचीही लवकरच चौकशी !वसुलीच्या आराेपानंतर गृहमंत्रीपद गमवाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याकडे याबाबत येत्या एक, दोन दिवसांत चौकशी केली जाणार आहे. साक्षीदारांकडील तपासाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.