मुंबई – दिवाळीनिमित्त मनसेच्या वतीनं दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दीपोत्सवाचं आयोजन केले आहे. यंदा या दीपोत्सवाला बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सलीम जावेद यांनी हजेरी लावली होती. त्याचसोबत अभिनेत्री रितेश देशमुख यांनी या जोडीची भन्नाट मुलाखत घेतली. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी जबरदस्त टोलेबाजी केली, तेव्हा राज ठाकरेंसह उपस्थित सगळेच खळखळून हसायला लागले.
या मुलाखतीत रितेश देशमुख यांनी प्रश्न विचारला होता की, त्याकाळी सुपरस्टार १५ लाख रुपये घेत होते इतकेच म्हणताच जावेद अख्तर यांनी तुम्ही इन्कम टॅक्समध्ये अडकवणार आहात का? आपला हेतू काय? उघडपणे सांगा, काय पसंत करणार, सीबीआय, ईडी की इन्कम टॅक्स? काय हवंय तुम्हाला आज..१५ लाख, १५ लाख काय, इतके पैसे आम्ही कधी पाहिले नाही असं अख्तर म्हणाले तर सलीम खान यांनी तुमची नियत ठीक नाही, तुम्ही आतमध्ये टाकायला बसलाय वाटतं असं म्हटलं तर तुम्ही गरीब लेखकाची टिंगळ करताय असं जावेद अख्तर यांनी म्हटलं. त्यावेळी सगळेच हसायला लागले.
ज्या काळात अभिनेत्यांना १५ लाख मिळायचे, तेव्हा सलीम जावेद यांच्यासारख्या लेखकांना २५ लाख दिले जायचे असं रितेश देशमुख यांनी म्हटलं तेव्हा असं काही नाही, हे आमच्या फाईली उघडत आहेत पण ते होणार नाही. काश हे खरे असते पण आम्हाला कधी इतके पैसे मिळाले नाही असं अख्तर यांनी उत्तर दिले. तर त्यावेळी अभिनेते त्या जमान्यात कमी पैसे घेत असतील असंही त्यांनी विनोदी शैलीत सांगितले.
अख्तर यांनी म्हटलं की, सध्याच्या जमान्यात सर्वकाही जलद गतीनं होतंय, पूर्वी एक पत्र लिहलं जायचं, ३ दिवसांनी मिळायचे, २ दिवस उत्तर काय लिहू त्यात जायचे, मग ते ३ दिवसांनी जायचे. एका पत्राला उत्तर मिळायला ८-९ दिवस जायचे. आज तुमच्याकडे मोबाईल आहे. १ सेकंदात कुणाचीही बोलू शकता. प्रत्येक गोष्ट जलद गतीने पुढे जातेय. लवकर होतेय. त्यामुळे आपल्याला यशही लवकर हवं असतं, त्यासाठी संयम ठेवायचा नसतो. त्यामुळे जी तयारी असायची, मग ती आशाजी, लताजी, रफीसाहेब, मोठमोठे लेखक त्या जमान्यात होते ते खूप शिकलेले होते. ४ सिनेमे पाहिले, २ नोवेल वाचून ते लेखक झाले नव्हते. वर्षांची मेहनत होती. कॅरेक्टर कसे असायचे, कोणती भाषा वापरायची, ही तयारी असायची. आजकाल प्रत्येक गोष्टी लवकर हव्या असतात. लता मंगेशकर, आशा भोसले यांनी वर्षोनुवर्षे मेहनत घेतलीय. त्यामुळे मेहनत गरजेची आहे. यश लगेच मिळत नाही त्यामागे भरपूर मेहनत असते. सहजपणे सर्व हवे असते हे खेदाची बाब आहे असं जावेद अख्तर यांनी लोकांना सांगितले.