मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं एफआरआर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. CBI files FIR against former Maharashtra home minister Anil Deshmukh सीबीआयकडून सुरू असलेली अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी काल पूर्ण झाली. त्यानंतर आज देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयानं गेल्याच आठवड्यात या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती सोपवला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही, हे पाहण्यासाठी न्यायालयानं सीबीआयला १५ दिवसांचा कालावधी दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं देशमुख आणि इतरांची चौकशी सुरू केली.अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणी सीबीआयनं १४ एप्रिलला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.या प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक (संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे), निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंचे दोन चालक, बार मालक, मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांची चौकशी केली आहे.