CBI Arrests CGST Officer : सीबीआयने ६० लाख रुपयांच्या लाच प्रकरणात मुंबईतील करचोरी विरोधी शाखेत नियुक्त केलेल्या केंद्रीय वस्तू व सेवा कर अधीक्षकासह तीन आरोपींना अटक केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. सीबीआयने असाही आरोप केला आहे की आरोपींना हवालामार्फत लाचेचे पैसे देण्यात आले होते आणि त्यांनी ६० पैकी ३३ लाख रुपयांची लाच घेतली होती. या कारवाईमुळे जीएसटी विभागात खळबळ उडाली आहे.
जीएसटी अधीक्षक सचिन गोकुळका, चार्टर्ड अकाउंटंट राज अग्रवाल आणि अभिषेक मेहता यांना लाच म्हणून २० लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. एका तक्रारीवरून सीबीआयने सीजीएसटीच्या सहा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यात अतिरिक्त आयुक्त दीपककुमार शर्मा, सहआयुक्त राहुल कुमार, गोकुळका, बिजेंद्र जानवा, निखिल अग्रवाल, नितीनकुमार गुप्ता, अग्रवाल आणि मेहता यांचा समावेश होता.
आरोपी जीएसटी अधिकारी सचिन गोकुळका हे मुंबई पश्चिम आयुक्तालयाचे सीजीएसटी (अँटी-इव्हेशन) अधीक्षक आहेत. लाच घेताना दोन खासगी व्यक्तींसह त्यांना पकडण्यात आले. सीजीएसटी चौकशीत अटक टाळण्यास मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून ६० लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, लाचेच्या रकमेचा दुसरा हप्ता म्हणून २० लाख रुपये घेताना ते सीबीआयच्या जाळ्यात अडकले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, लाचेच्या एकूण रकमेपैकी ३० लाख रुपये हे त्यांना आधीच हवाला मार्गाने दिले गेले होते.
एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराने आरोप केला की त्याला चार सप्टेंबर रोजी सीजीएसटीच्या सांताक्रूझ कार्यालयात रात्रभर कोंडून ठेवले होते. १८ तास डांबून ठेवल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी त्याची सुटका करण्यात आली अशी माहिती तक्रारदाराने दिली. डांबून ठेवल्यावर अधिक्षक सचिन गोकुळकाने अटक न करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली. मात्र ही रक्कम ६० लाखांवर आणण्यात आली. अधीक्षक सचिन गोकुळकाचे इतर तीन सहकारी देखील तक्रारकर्त्यावर दबाव आणण्यासाठी त्याच्यासोबत सामील झाले होते. त्यांनी वारंवार बळाचा वापर केला आणि शिवीगाळ केल्याची तक्रार तक्रारकर्त्याने केली.
सीजीएसटी अधिकाऱ्यांनी अटक न केल्याची आणि तपासात मदत केल्याबद्दल सांगण्यासाठी तक्रारकर्त्याला त्याच्या चुलत भावाला कॉल करण्यास भाग पाडण्यात आले. तक्रारदाराच्या चुलत भावाने त्यानंतर अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. अग्रवालने इतर आरोपींसह आयुक्त कुमार यांच्यासह वरिष्ठ सीजीएसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अग्रवाल आणि मेहता यांनी मध्यरात्री सीजीएसटी कार्यालयाला गाठलं आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लाचेची रक्कम ६० लाख रुपयांपर्यंत खाली आणली.
त्यानंतर ६० पैकी ३० लाख तक्रारदाराच्या भावाने हवालाच्या मार्फत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. त्यानंतरच तक्रारदाराला दुसऱ्या दिवशी सीजीएसटी कार्यालयातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. उरलेल्या लाचेच्या रकमेपैकी २० लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने सीए अग्रवाल याला रंगेहात अटक केली. त्यानंतर लाच दुसऱ्या एका खाजगी व्यक्तीला देण्यात आली जी गोकुळका मार्फत सीजीएसटी अधिकाऱ्यांना दिली जाणार होती. पुढच्या कारवाईदरम्यान, गोकुळकाने खाजगी व्यक्तीला लाच घेण्यासाठी मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ भेटण्यासाठी बोलावले आणि त्यालाही अटक करण्यात आली.
सीबीआयने कारवाईदरम्यान लाच घेताना तीन आरोपींना अटक केली. त्यांना सीबीआय प्रकरणांसाठी, मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटक केलेल्या अधीक्षक सीजीएसटी आणि सीएला १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.