सीबीआयने बनावट पुरावे सादर केल्याने साक्षीदार फितूर, सोहराबुद्दिन शेख बनावट चकमक प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:14 AM2018-07-06T00:14:25+5:302018-07-06T00:14:33+5:30
सोहराबुद्दिन बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने बनावट पुरावे सादर केल्याने विशेष न्यायालयात सरकारी वकिलांचे सर्व महत्त्वाचे साक्षीदार फितूर होत आहेत, असा दावा बचावपक्षातर्फे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी उच्च न्यायालयात गुरुवारी केला.
मुंबई : सोहराबुद्दिन बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने बनावट पुरावे सादर केल्याने विशेष न्यायालयात सरकारी वकिलांचे सर्व महत्त्वाचे साक्षीदार फितूर होत आहेत, असा दावा बचावपक्षातर्फे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी उच्च न्यायालयात गुरुवारी केला. आतापर्यंत विशेष न्यायालयाने १३२ सरकारी साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यापैकी ८० साक्षीदार फितूर झाले आहेत.
विशेष न्यायालयाने आरोपमुक्त केलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी उच्च न्यायालायत युक्तिवाद केला. ‘कथित बनावट चकमकीच्या वेळी उपस्थित असलेले आणि सीबीआयचे महत्त्वाचे साक्षीदार नथुबा जडेजा आणि गुरदयाल सिंग फितूर झाले, तर त्यात आश्चर्य नाही. या दोघांकडून जबरदस्तीने साक्ष घेण्यात आली. कारण त्यांनी सीबीआयच्या म्हणण्यानुसार साक्ष दिली असती तरी ती न्यायालयात टिकली नसती,’ असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.
सीबीआयने बनावट पुराव्यांच्या आधारावर केस उभी केली. २००५ ते २०१० या कालावधीत जडेजाचा सात वेळा जबाब नोंदविण्यात आला. सुरुवातीला त्याने सीआयडीला ही चकमक खरी असल्याचे सांगितले. मात्र, सीबीआयने त्याच्याकडून जबरदस्तीने ही बनावट चकमक असल्याचे वदवून घेतले. हीच परिस्थिती गुरदयाल सिंग याची आहे. या दोघांनीही गुजरात दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. गेल्या वर्षी त्यांनी विशेष न्यायालयात साक्ष फिरवली. सीबीआयचे साक्षीदार विश्वासार्ह नाहीत, असे जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले.
त्यावर न्या. ए.एम. बदर यांनी आणखी किती साक्षीदारांची साक्ष नोंदविणार आहात, असा प्रश्न केला असता सीबीआयने आणखी ८० साक्षीदारांची साक्ष नोंदविणार असल्याचे सांगितले. एकूण ७०९ साक्षीदार आहेत. परंतु, तेवढ्या साक्षीदारांची साक्ष नोंदविणार नाही, असे सीबीआयतर्फे अॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.
२००५मध्ये सोहराबुद्दिन व त्याची पत्नी कौसर बाई यांची गुजरात पोलिसांनी बनावट चकमकीद्वारे हत्या केली.