राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर त्यांची 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांची सीबीआयकडून रविवारी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनाही सीबीआयनं समन्स धाडलं आहे. (CBI has summoned former Maharashtra Home Minister Anil Deshmukh on 14th April)
सीबीआयच्या तपास पथकाकडून रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व साहाय्यक एस. कुंदन यांची कसून चौकशी केली होती. सुमारे चार तास त्यांचा स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत गेल्या सहा दिवसांपासून सीबीआय चौकशी करत आहे. आणखी आठ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी पूर्ण करून त्यांना उच्च न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे हे प्रकरण माजी गृहमंत्री देशमुख यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि साहाय्यक आयुक्त संजय पाटील तसेच एनआयएच्या अटकेतील सचिन वाझेची चौकशी करण्यात आली आहे.