दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयच्या समन्सवर दिलासा देण्यास नकार दिल्याने एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली न्यायालयाने त्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. यावर वानखेडेंनी सीबीआय आपल्यावर बदल्याच्या भावनेने कारवाई करत असल्याचा दावा अपिलात केला आहे. यावर आज दुपारी अडीज वाजता सुनावणी होणार आहे.
सुटीकालीन कोर्टाने तातडीने सुनावणी ठेवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडेंना २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. यामुळे वानखेडेंनी गुरुवारी सीबीआयने बजावलेल्या चौकशीच्या समन्सवरून हजेरी लावली नव्हती. सीबीआयने वानखेडेंना चौकशीला बोलावले होते.
दिल्ली उच्च न्यायालयात वानखेडेंनी NCB चे उप महासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरोधात क्रॉस एफआयआर करण्याची मागणी केली होती. वानखेडे यांच्यावर कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी केसमध्ये आर्यन खानला वाचविण्यासाठी शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याचबरोबर छाप्यावेळी केलेल्या चुका, भ्रष्टाचारासाठी रचलेले प्लॅन आदींवरही सीबीआयने एफआयआरमध्ये उल्लेख केला आहे.
पुरेशा पुराव्याअभावी एनसीबीने आरोपपत्रात आर्यन खानचे नाव समाविष्ट केले नाही. त्याचवेळी तपासादरम्यान आपला अपमान व छळ करण्यात आल्याचा आरोप वानखेडे यांनी गुरुवारी केला. गृह मंत्रालयाने केलेल्या एनसीबीच्या तपासावर आधारित, शाहरुख खानकडून लाच मागितल्याप्रकरणी वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर वानखेडे यांनी गुरुवारी एजन्सीसमोर हजर राहण्याची तयारी दर्शवली होती. परंतू सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, वानखेडे गुरुवारी चौकशीसाठी आले नाहीत.