Join us

पीटरच्या जामीन अर्जाला सीबीआयचा विरोध

By admin | Published: April 15, 2016 2:41 AM

शीना बोरा हत्येप्रकरणी तिचे सावत्र वडील पीटर मुखर्जी यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या जामीन अर्जालाही सीबीआयने बुधवारी विरोध केला. पीटर यांचा पहिला जामीन अर्जही विशेष

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी तिचे सावत्र वडील पीटर मुखर्जी यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या जामीन अर्जालाही सीबीआयने बुधवारी विरोध केला. पीटर यांचा पहिला जामीन अर्जही विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला होता.सीबीआयचा तपास सुरू आहे आणि आरोपपत्र दाखल करायचे आहे, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाने पीटर मुखर्जीचा पहिला जामीन अर्ज फेटाळला होता. आता सीबीआयने पीटर यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा पीटरने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात शीना बोरा हत्याप्रकरणी मला दोषी ठरवण्याकरिता ठोस कारणे नाहीत. कोठडीत ठेवण्यासाठी पुरेसे स्पष्टीकरण नाही. पुरेसे पुरावे नाहीत, असे पीटर यांनी म्हटले आहे.आरोपपत्रानुसार, पीटर यांना शीना व राहुल यांच्यातील प्रेमसंबंध मान्य नव्हते, म्हणून ते शीनाच्या हत्येच्या कटात सहभागी झाले. मात्र पीटरने हा आरोप फेटाळला आहे. डिसेंबर २०११ मध्ये मी राहुलला पाठवलेल्या ई-मेलवरून मी या नात्याच्या कधीच विरोधात नव्हतो, असे स्पष्ट होते. नाहक या केसमध्ये मला गोवण्यात येत आहे, असे पीटरने अर्जात म्हटले आहे.अर्जाला विरोध करताना सीबीआयने पीटर हत्येच्या कटात सहभागी असल्याचे न्यायालयाला सांगितले. विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी) ‘पीटरने राहुलला पाठवलेले मेल त्याची दिशाभूल करणारे होते. या केसचा तपास अजूनही सुरू आहे. पीटरही या कटात सहभागी होता, हे सिद्ध करणारे पुरावे सीबीआयकडे आहेत. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येऊ नये,’ असे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.