छोटा राजनच्या जामिनाला ‘सीबीआय’चा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:00+5:302021-07-29T04:07:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला देशातील कायद्याचा आदर नाही, असे म्हणत ‘सीबीआय’ने छोटा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला देशातील कायद्याचा आदर नाही, असे म्हणत ‘सीबीआय’ने छोटा राजनच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला.
राजन याच्यावर ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांपैकी काही प्रकरणांत त्याला शिक्षाही झाली आहे. तो झेड प्लस सुरक्षा असलेल्यांसाठी धोका आहे. तो कित्येक वर्षे फरार आरोपी होता. अखेरीस २०१५ मध्ये त्याला इंडोनेशियातून अटक करून भारतात आणण्यात आले. तो नाव बदलून, वेशांतर करून पोलिसांना गेली कित्येक वर्षे गुंगारा देत होता. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका करू नये, अशी विनंती सीबीआयच्या वतीने ॲड. प्रदीप घरत यांनी उच्च न्यायालयाला केली.
हॉटेल व्यावसायिकाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राजनला २०१९ मध्ये विशेष मोक्का न्यायालयाने आठ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. यावरील अपील प्रलंबित असल्याने राजन याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. राजन याच्याविरोधात केवळ ऐकीव पुरावे आहेत. कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असा युक्तिवाद सुदीप पासबोला यांनी न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने सीबीआयकडून राजनवर नोंदविण्यात आलेले गुन्हे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, इत्यादींबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश देत दोन आठवड्यांनंतर या याचिकेवर सुनावणी ठेवली.