मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने न्यायालयात पाचव्यांदा जामीन अर्ज दाखल केला. पाचही वेळा सीबीआयने तिच्या जामीन अर्जाला विरोध केला. याआधी तिने प्रकृतिअस्वास्थ्याचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. तर या वेळी तिने गुणवत्तेच्या आधारे जामीन अर्ज सादर केला. आपल्याविरोधात पुरावे नाहीत, असा दावा तिने केला आहे.
इंद्राणीच्या जामीन अर्जाला विरोध करताना सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, इंद्राणीने तिच्या मुलीची हत्या केली, तर मुलाच्या हत्येचा प्रयत्न केला. इंद्राणीची जामिनावर सुटका केली तर ती साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. साक्षीदारांची विश्वासार्हता ही खटल्याच्या अखेरीस ठरेल.
आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सीबीआयला २५३ साक्षीदारांची साक्ष नोंदवायची आहे. आतापर्यंत ६० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. १९२ साक्षीदारांची साक्ष नोंदवायची आहे. ज्यांची अद्याप साक्ष नोंदविणे बाकी आहे त्यांच्यामध्ये इंद्राणीचा सावत्र मुलगा राहुल मुखर्जी याचाही समावेश आहे.
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात माफीचा साक्षीदार ठरलेला इंद्राणी मुखीर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने इंद्राणी मुखर्जी हिने शीना बोराची हत्या करण्यासाठी कशी तयारी केली आणि पुरावे कशा प्रकारे नष्ट केले, याची माहिती त्याच्या जबाबात दिली आहे. श्यामवर राय याने न्यायालयाला दिलेल्या साक्षीनंतर या हत्याकांड प्रकरणी बराच खुलासा होण्यास मदत झाली आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल याच्याशी लग्न करण्यासाठी शीना बोरा इंद्राणी मुखर्जीला ब्लॅकमेल करत होती. इंद्राणी व पीटरला हा विवाह मान्य नव्हता. शीनाने राहुलशी लग्न करू नये, असे त्यांना वाटत होते. ज्या दिवशी शीनाची हत्या करण्यात आली, त्या दिवशी राहुलने शीनाला तिच्या इमारतीच्या गेटजवळ सोडले आणि थोड्या वेळानंतर इंद्राणी, ड्रायव्हर श्यामवर राय आणि शीना यांना एकत्रित बाहेर जाताना पाहिले. त्यानंतर राहुलने शीनाला कधीच पाहिले नाही.