मुंबई: सुशांतसिंग राजपूत (३४) च्या मृत्यूचे दिशा सालीयन प्रकरणाशी 'कनेक्शन' असल्याचा दावा सोशल मीडिया तसेच राजकारण्यांकडून केला जात होता. मात्र आठवडा उलटून देखील मालवणी पोलिसांकडे दिशा प्रकरणाची फाईल त्यांनी मागितलेली नाही. त्यामुळे त्यांना अद्याप याबाबत काही पुरावे सापडले नसल्याची चर्चा आहे.
सीबीआयकडे सुशांतसिंग प्रकरणी तपास देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले. त्यांनी विविध अनुषंगाने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. ज्यात सुशांतच्या बँक डिटेल्सपासून त्याला ड्रग्ज दिले जात असल्यापर्यंत सर्व चौकशी त्यांनी केली आहे. मात्र दिशा सालीयन प्रकरणाची फाईल अद्याप त्यांनी मालवणी पोलिसांकडे मागितलेली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तसेच या पथकाने मालवणी पोलीस ठाण्याला भेटही दिलेली नाही. त्यामुळे सीबीआयला सुशांतच्या मृत्यूमध्ये दिशाच्या मृत्यूचे काही कनेक्शन सापडले नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सीबीआय आता मालवणी पोलीस ठाण्याला कधी भेट देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
'त्या' तिघांविरोधात चौकशी करा - कोर्टदिशाच्या मृत्यूप्रकरणी आक्षेपार्ह माहिती व्हायरल करणाऱ्या तीन जणाविरोधात तिचे वडील सतीश सालीयन यांनी लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी एनसी दाखल करत न्यायालयाकडे चौकशीसाठी परवानगी मागितली होती. ही परवानगी त्यांना मिळाली असुन तिघांना मालवणी पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहेत. ज्यात एक अभिनेता व दोन युट्युबरचा समावेश आहे.