Join us  

सीबीआयचा तपास बेकायदेशीर, कसाबलाही कायद्याचा लाभ घेता आल्याचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 8:14 AM

अनिल देशमुख यांचा न्यायालयात दावा : कसाबलाही कायद्याचा लाभ घेता आल्याचा युक्तिवाद

ठळक मुद्देशुक्रवारी देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, जरी प्राथमिक चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आली असली तरी सीबीआयने गुन्हा दाखल करताना कायद्याचे उल्लंघन केले आहे.

मुंबई : भ्रष्टाचार प्रकरणी सध्या सीबीआय करत असलेला तपास बेकायदेशीर आहे तसेच कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करणारा आहे, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी केला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबलाही या देशातील कायद्याचा लाभ घेता आला, असा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून प्राथमिक चौकशी करण्यात आली असली तरी अनिल देशमुख यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी सीबीआयने राज्य सरकारकडून मंजुरी घेतली नाही. देशमुख हे त्यावेळी सरकारी कर्मचारी होते, असा युक्तिवाद देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्या. एस.एस. देशमुख व न्या. एन.एम. जमादार यांच्या खंडपीठापुढे केला.

सरकारने मंजुरी दिली नसताना देशमुख यांची भ्रष्टाचार व गैरवर्तवणूक प्रकरणी सीबीआयने त्यांची प्राथमिक चौकशी केली. तुम्ही कायद्याला डावलून असे करू शकता का? सरकारशी संपर्क करता आला असता. त्यामुळे संपूर्ण प्राथमिक चौकशीच बेकायदा आहे. आपण कदाचित भावनेच्या भरात वाहू शकतो. परंतु आपण कायदेशीर प्रक्रिया डावलू शकतो का? कसाबसारख्या व्यक्तीलाही देशाच्या कायद्याचा फायदा मिळतो. प्रत्येकालाच कायद्याचा लाभ घेता येतो, असा युक्तिवाद देसाई यांनी खंडपीठापुढे केला. अनिल देशमुख हे पोलीस बदल्यांत व नियुक्त्यांबाबत हस्तक्षेप करून भ्रष्टाचार करत असल्याचे व बार व रेस्टॉरंटमालकांकडून १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप करत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. या पत्राचा आधार घेत व्यवसायाने वकील असलेल्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर उच्च न्यायालयाने देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला एप्रिल महिन्यात दिले. त्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार व गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शुक्रवारी देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, जरी प्राथमिक चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आली असली तरी सीबीआयने गुन्हा दाखल करताना कायद्याचे उल्लंघन केले आहे. सीबीआयने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम १७(ए)चे उल्लंघन केले आहे. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यापूर्वी सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे.त्यावर न्यायालयाने म्हटले की, देशमुख पोलीस बदल्यांमध्ये व नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप करत असताना ते त्यांचे कर्तव्य पार पाडत नव्हते, असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. देसाई यांनी या प्रतिज्ञापत्रातील म्हणणे खोडताना म्हटले की, सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा रुजू करून घेणे व अन्य सर्व कृत्य देशमुख यांनी एक सरकारी कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावत असताना केली, असे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे.  

‘मी ईडीला यापूर्वीही सहकार्य केले, पुढेही करेन’ 

मुंबई : ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोनाचे कारण पुढे करत सक्तवसुली संचालनालया-समोर (ईडी) प्रत्यक्ष हजर राहण्यास नकार दिला आहे. अशात, शुक्रवारी त्यांनी ट्वीट करत मी ईडीला यापूर्वी सहकार्य केले आहे पुढेही करेन, असे म्हटले आहे.ईडीने मला कागदपत्रांसहीत उपस्थित राहावे, असे दोन समन्स पाठविले आहेत. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला ‘इसीआयआर’ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठवता येईल. त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या दोन्ही पत्रांत केला आहे. मी ईडीला यापूर्वी सहकार्य केले आहे पुढेही करेन, असे ट्वीटमध्ये अनिल देशमुख यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :अनिल देशमुखगुन्हा अन्वेषण विभागअंमलबजावणी संचालनालय