१०० कोटी हप्ता वसुलीप्रकरण; अहवाल २० एप्रिलला करणार सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतून १०० कोटी रुपयांच्या हप्ता वसुलीचे टार्गेट दिल्याबाबतच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गुरुवारी त्याबाबत देशमुख यांच्याकडून काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. यासंदर्भातील निष्कर्षाचा अहवाल २० एप्रिलला न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी आले.
सीबीआयने बुधवारी अनिल देशमुख यांच्याकडे सुमारे साडेआठ तास चौकशी केली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना आपल्याकडे विषयानुरूप ब्रीफिंगसाठी विविध अधिकारी येत असल्याचे सांगितले. मुंबईतील १,७५० बार, लॉजेसमधून वसुलीबाबतचा आरोप फेटाळून लावताना त्याबाबत अधिवेशनात एका तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती घेण्यात येत असल्याचे सांगितले होते. त्याच्या खात्रीसाठी विधिमंडळ सदस्यांकडून आलेले प्रश्न, त्यावरील उत्तरे आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता गुरुवारी देशमुख यांनी केली.
या प्रकरणात सर्व संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्याची शहानिशा करून प्राथमिक चौकशीचा अहवाल २० एप्रिलला न्यायालयात सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. सीबीआयने आतापर्यंत वसुली करण्यात येत असल्याचा आरोप करणाऱ्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि साहाय्यक आयुक्त संजय पाटील तसेच एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझे, देशमुख यांचे सचिव व साहाय्यकांचे सविस्तर जबाब नोंदविले.
......................