सीबीआयने नोंदविला रश्मी शुक्ला यांचा जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:36+5:302021-04-30T04:07:36+5:30

हप्ता वसुली, बदली रॅकेट प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री ...

CBI records Rashmi Shukla's reply | सीबीआयने नोंदविला रश्मी शुक्ला यांचा जबाब

सीबीआयने नोंदविला रश्मी शुक्ला यांचा जबाब

Next

हप्ता वसुली, बदली रॅकेट प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) पथकाने ज्येष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला यांचा हैदराबाद येथे जाऊन जबाब नोंदविला. महाराष्ट्र गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दल सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आल्याचे समजते.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या मुंबई, नागपूरच्या निवासस्थानासह विविध कार्यालय व मालमत्तेवर गेल्या शनिवारी छापे टाकले होते. सिंग यांच्या आरोपांमध्ये शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला होता. त्या अनुषंगाने सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या हैदराबाद येथील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुक्ला यांचा दोन दिवसांपूर्वी जबाब नोंदविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सीबीआयने गुन्हा दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशीत परमबीर सिंंग, अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले आहेत. याशिवाय निलंबित एपीआय सचिन वाझे आणि त्याच्या दोन वाहनचालकांसह अनेकांचे जबाब नाेंदवण्यात आले आहेत. सीबीआय या गुन्ह्यात शुक्ला यांना साक्षीदार म्हणून सादर करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

* सायबर पोलीसही नाेंदवणार जबाब

अतिगोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीला हजर राहण्यासाठी सोमवारी समन्स बजाविण्यात आले होते; परंतु शुक्ला यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत येण्यास असमर्थता दर्शवित एफआयआरची कॉपी व चौकशीची प्रश्नावली मागितली आहे; मात्र सायबर पाेलिसांना त्यांना मुंबईत बोलावून त्यांची चौकशी करायची असल्याचे समजते. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यांना हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स पाठविले जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.

* असे आहे प्रकरण

शुक्ला एसआयडी प्रमुख असताना गेल्यावर्षी २५ ऑगस्टला पोलीस अधिकारी बदली रॅकेटबद्दल त्यांनी काही व्यक्तींचे फोन टॅप करून अहवाल तयार केला हाेता. महाराष्ट्र सरकारने ताे फेटाळून लावला. सरकारची दिशाभूल करून अधिकाराचा गैरवापर करत नियमबाह्य कृत्य केल्याचा ठपकाही शुक्ला यांच्यावर ठेवला हाेता. त्याबाबत त्यांनी माफी मागितल्यानंतर कारवाई करण्याचे टाळण्यात आले होते; मात्र तोच गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २३ मार्चला उघड करून राज्य सरकारवर आरोप केले हाेते.

...........................................

Web Title: CBI records Rashmi Shukla's reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.