सीबीआय तपासाची मागणी करणारी याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:00 AM2020-11-28T04:00:01+5:302020-11-28T04:00:01+5:30
उच्च न्यायालय : दिशा सालियन मृत्यू प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी ...
उच्च न्यायालय : दिशा सालियन मृत्यू प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या देखभालीखाली सीबीआय तपास करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. तसेच ज्यांच्याकडे या प्रकरणाबाबत माहिती आहे, त्यांनी मुंबई पोलिसांना संपर्क करावा, असे न्यायालयाने सांगितले.
‘तुम्ही कोण आहात?’ असा सवाल उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते पुनीत धांडा यांना केला. ‘जर तिच्या मृत्यूबाबत काही संशयास्पद असेल तर तिचे कुटुंबीय कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करतील,’ असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.
दिशाचा ८ जून रोजी मालाड येथील राहत्या घराच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तिचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा व त्यावर उच्च न्यायालयाने देखभाल करावी, अशी मागणी धांडा यांनी केली होती.
पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी प्रेस नोट काढत ज्यांना दिशाच्या मृत्यूबद्दल माहिती असेल त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदविले. याचिकाकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क केल्याचे पुरावे नाहीत. याचिकाकर्त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालय गाठले, असे न्यायालयाने म्हटले. गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने धांडा यांची याचिका फेटाळत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले हाेते. त्यानुसार, धांडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली.