माजी पोलिस आयुक्तांना सीबीआयचा दिलासा, संजय पांडेंची कंपनी व सेबी यांना क्लीन चिट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:14 AM2023-08-31T02:14:31+5:302023-08-31T05:48:17+5:30
संजय पांडे यांच्याशी निगडीत आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला दोन कंपन्यांच्या लेखापरीक्षणाचे काम राष्ट्रीय शेअर बाजारकडून मिळाले होते.
मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराशी निगडीत को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे, भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांना अखेर सीबीआयकडून दिलासा मिळाला असून, पुराव्याअभावी सीबीआयने हे प्रकरण बंद केल्याचे समजते.
संजय पांडे यांच्याशी निगडीत आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला दोन कंपन्यांच्या लेखापरीक्षणाचे काम राष्ट्रीय शेअर बाजारकडून मिळाले होते. अशा पद्धतीचे काम मिळते, तेव्हा ती कंपनी केवळ तीनच वर्षांसाठी लेखापरीक्षण करू शकते. त्यानंतर दुसऱ्या कंपनीला हे काम दिले जाते. आयसेक कंपनीला हे काम दिल्यानंतर मात्र या नियमाचा भंग झाल्याचे दिसून आले होते.
क्लोजर रिपोर्ट दाखल?
सेबी व राष्ट्रीय शेअर बाजाराचे कर्मचारी यांच्याशी संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप करत सीबीआयने मे २०२२ मध्ये आयसेक, सेबी व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला होता. मात्र, या प्रकरणी फारसा पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे सीबीआयने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला असल्याचे समजते. परिणामी, या तिघांनाही दिलासा मिळाला आहे.
मुंबई पोलिस आयुक्त पदावरून ३० जून २०२२ रोजी निवृत्त झालेल्या संजय पांडे यांना आयसेक कंपनीत झालेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.