गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: सुशांतसिंग राजपूत सिंग प्रकरणी रिया चक्रवर्ती हिला सुरक्षा पुरविल्याबाबत मुंबई पोलिसांवर तिला 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र सीबीआयच्या लेखी विनंती पत्रानुसारच तिला ही सुरक्षा पुरविल्याचे स्पष्टीकरण पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिली असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आमची जबाबदारी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
सांताक्रूझ पूर्वच्या वाकोला परिसरात डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये रियाची चौकशी केली जात आहे. सांताक्रूझ पोलिसांच्या हद्दीत रिया कुटुंबासह राहते. शुक्रवारी काही प्रसारमाध्यमानी तिला धक्काबुक्की केली. तसेच तिच्यावर सुशांतच्या फॅन्सचाही राग आहेच. त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबियांना यामुळे धोका आहे. शनिवारी रिया डीआरडीओ कार्यालयात जाताना तिला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. त्यावरून पुन्हा मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करत आरोपीला 'रेड कार्पेट' सुरक्षा पुरविली जात असल्याचे म्हटले जात होते. याबाबत 'लोकमत' ने परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांना संपर्क केला. तेव्हा सीबीआयने रियाला सुरक्षा पुरविण्याबाबत लेखी विनंती केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लिंचिंग झाल्यास जबाबदार कोण?'आमचा तपासाशी संबंध नाही, पण कायदा सुव्यवस्था राखणे ही आमची जबाबदारी आहे. रियाची लिंचिंग झाली आणि त्यात तिच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तरी त्याचा दोष मुंबई पोलिसांवर येणार,मात्र रियाला सुरक्षा पुरविण्याबाबत सीबीआयने आम्हाला लेखी पत्र दिले आहे आणि त्यानुसार आम्ही त्याचे पालन करत आहोत.