मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास गेल्या वर्षभरापासून सीबीआय करीत आहे. त्याने आत्महत्या केली की हत्या होती, हे त्यांनी आता तरी स्पष्ट करावे, असे आवाहन राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे. त्यांच्या मौनामुळे केंद्र सरकारचे यानिमित्ताने महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते हे स्पष्ट झाले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एखादी घटना घडली की त्या-त्या राज्यात तपास राहतो, मात्र राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करून प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. एक वर्ष सीबीआय या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या, हे स्पष्ट केलेले नाही की कोणालाही अटक केलेली नाही, असे सांगून मलिक म्हणाले. बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांत प्रकरण रंगवण्यात आले होते. मात्र या प्रकरणाचा मुंबई पोलीस करीत असलेला तपास योग्य होता, हे स्पष्ट झाले आहे.
"सीबीआयने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाची प्रगती स्पष्ट करावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 7:10 AM