ठोस पुराव्याअभावी सीबीआयचे एक पथक माघारी; आवश्यकतेनुसार परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 02:43 AM2020-09-17T02:43:20+5:302020-09-17T06:15:26+5:30
सहसंचालक मनोज शशीधर यांच्यासह दहाहून अधिक अधिकाऱ्यांचा यात समावेश असून, आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल संचालकांना सादर केला जाईल.
- जमीर काझी
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासानिमित्त जवळपास गेल्या महिनाभरापासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष तपास पथकातील निम्म्याहून अधिक जण म्हणजे जवळपास एक पथक बुधवारी दिल्लीला रवाना झाले.
सहसंचालक मनोज शशीधर यांच्यासह दहाहून अधिक अधिकाऱ्यांचा यात समावेश असून, आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल संचालकांना सादर केला जाईल. आवश्यकतेनुसार काही अधिकारी परत येतील; अन्यथा उर्वरित पथक स्थानिक अधिकाऱ्यांसह पुढील कार्यवाही करेल, असे सूत्रांनी सांगितले.
महिनाभराच्या तपासात सुशांतची हत्या झाल्याबद्दल एकही सबळ पुरावा हाती लागलेला नाही, त्यामुळे त्याला आत्महत्येला प्रेरित केले का, याच अनुषंगाने तपासावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी कोणत्याही ठोस आणि सबळ पुराव्याअभावी पथकाला माघारी परतावे लागले.
सर्वोच्च न्यायालयाच्या १९ आॅगस्टच्या निकालानंतर शशीधर यांच्या नेतृत्वाखाली १५ अधिकारी, अंमलदारांचे पथक मुंबईत आले. त्यात उपमहानिरीक्षक गगणदीप गंभीर, अधीक्षक नूपुर प्रसाद या महिला अधिकाºयासह अप्पर अधीक्षक मनोज शशीधर व अन्य अधिकारी होते. त्यांनी प्रमुख संशयित, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंब, सुशांतचे मित्र, सर्व संबंधितांकडे शेकडो तास चौकशी केली. घटनास्थळाची कित्येकवेळा कसून तपासणी केली. मात्र रिया किंवा इतरांना अटक करण्याइतपत त्यांना पुरावे मिळाले नाहीत.
एम्सच्या मंडळाची आज बैठक : सुशांतचा व्हिसेरा फेरतपासणीसाठी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याबाबत फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पाच डॉक्टरांचे मंडळ बनविण्यात आले आहे. त्यांची गुरुवारी बैठक होईल. अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढची दिशा निश्चित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.