मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवरील अमली पदार्थांच्या प्रकरणात झालेल्या कथित लाचखोरीप्रकरणी आता सीबीआय या प्रकरणात अटक झालेल्या अरबाज मर्चंटचा जबाब नोंदविणार असल्याचे समजते. अरबाज हा अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनचा मित्र असून, आर्यनसोबत त्यालाही एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अटक केली होती.
आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा ठपका सीबीआयने वानखेडे यांच्यावर ठेवला असून, आतापर्यंत त्यांची चौकशीही सीबीआयने केली आहे. मात्र, ज्या दिवशी कॉर्डिलिया क्रूझवर छापेमारी झाली व त्यानंतर जे अटक सत्र झाले व त्यानंतर जी खंडणी मागितल्याची चर्चा आहे, त्यामध्ये नेमके काय झाले तसेच त्यावेळी घटनाक्रम काय होता, याची माहिती घेण्यासाठी सीबीआयचे अधिकारी अरबाज मर्चंट याचा जबाब नोंदविणार असल्याचे समजते. अरबाजसोबत अटक झालेल्या अन्य काही जणांचेही सीबीआय पुढील आठवड्यात नवी दिल्लीतील कार्यालयात जबाब नोंदविणार असल्याचे समजते.