Join us

कोट्यवधीचा महसूल बुडविणाऱ्या व्यापाऱ्यावर सीबीआयचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:06 AM

मुंबई : बनावट पावत्यांद्वारे कोट्यवधीचा महसूल बुडवून परदेशातून सुका मेव्याची तस्करी करणाऱ्या व्यापारी, दलाल व संबंधीत मंडळींवर ...

मुंबई : बनावट पावत्यांद्वारे कोट्यवधीचा महसूल बुडवून परदेशातून सुका मेव्याची तस्करी करणाऱ्या व्यापारी, दलाल व संबंधीत मंडळींवर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) बडगा उगारला आहे. मुंबई, नागपूर, अहमदाबाद येथील एकूण १९ ठिकाणची कार्यालये व गोदामांवर सोमवारी छापे टाकले असून, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या छाप्यातून बनावट व खोटी कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

शेकडो कोटींच्या फसवणूकप्रकरणी नागपुरात गेल्या ५ मार्चला सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा करण्यात आला होता.

सीमाशुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी आणि अज्ञात व्यापाऱ्यांनी संगनमत करून २०१६-१७ या आर्थिक वर्षात परदेशातून शेकडो कोट्यवधीचा सुका मेवा, खराब सुपारी आयात केली होती. नागपूर खंडपीठाने त्याबाबत सीबीआयला गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले.

कस्टम ड्युटी चुकविली

या प्रकरणात काही व्यापारी सुका मेवा, काजू परदेशी तस्करीत कार्यरत आहेत. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे, बोगस आणि अवमूल्यित बिले, पावत्या, बनावट नाहरकत प्रमाणपत्रे आणि त्यामुळे कस्टम ड्युटी चुकविण्यात आली असल्याचे सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.