* पुन्हा बाेलावण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला असून त्यांना पुन्हा बाेलावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि सहायक आयुक्त संजय पाटील यांचाही जबाब नोंदविला जाण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सीबीआयने मंगळवारपासून हप्ता वसुलीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. याचिकाकर्ती जयश्री पाटील यांच्याकडून रीतसर तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानंतर आज तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘लेटरबॉम्ब’द्वारे आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांना पाचारण करण्यात आले होते. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आरोपांच्या अनुषंगाने सविस्तर विचारणा केली. त्यामध्ये आरोपांना काय आधार आहे, या संपूर्ण प्रकरणाची त्यांना माहिती होती का? त्याबाबत समजल्यानंतर त्याचवेळी सचिन वाझेचा जबाब नोंदवून का घेतला नाही, त्याबाबत तक्रार घेतली का? याबाबत त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यांना आवश्यक त्यानुसार पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे सांगण्यात आले. परमबीर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांच्या पत्रात उल्लेख असलेल्या उपायुक्त भुजबळ, एसीपी पाटील यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. त्यानंतर मुख्य साक्षीदार सचिन वाझे याच्याकडे चौकशी केली जाणार आहे.