महापालिकेच्या दहा शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:07 AM2021-01-22T04:07:18+5:302021-01-22T04:07:18+5:30
मुंबई : गरीब कुटुंबातील विद्यार्थी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र, आजच्या स्पर्धात्मक युगात या विद्यार्थ्यांना अद्ययावत व ...
मुंबई : गरीब कुटुंबातील विद्यार्थी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र, आजच्या स्पर्धात्मक युगात या विद्यार्थ्यांना अद्ययावत व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पालिकेमार्फत विविध प्रयोग सुरू आहेत. त्यानुसार सीबीएसई बोर्डाच्या आणखी दहा शाळा २०२१-२२ पासून सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या शाळांमध्ये बालवाडी, छोटा शिशु वर्ग, मोठा शिशु वर्ग, पहिली ते सहावीपर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे.
महापालिकेमार्फत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा तसेच कनिष्ठ विद्यालय व चार वैद्यकीय महाविद्यालयेही चालविण्यात येतात. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना २७ प्रकारच्या शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. मात्र, अलीकडच्या काळात पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढत असल्याने इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील पालक परवडत नसतानाही सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत.
त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पालिकेच्या सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जोगेश्वरीतील पुनम नगर येथे प्रायोगिक तत्त्वावर एक शाळा सुरू करण्यात आली आहे. तसेच, वरळीत आसीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळांना पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने इतर विभागातही अशा प्रकारच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळांना पालिकेच्या इतर शाळांप्रमाणेच सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत.
* सीबीएसई शाळांमधील ९० टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने, तर पाच टक्के महापौरांच्या शिफारसीनुसार आणि पाच टक्के जागा महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव आहेत. या प्रवेशात आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्राधान्य असणार आहे.
...या ठिकाणी सीबीएसईची शाळा
भवानी शंकर रोड पालिका शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतीक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कुर्ला), राजावाडी शाळा (विद्याविहार), अझीझबाग शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व).