मुंबई : पालिकेच्या शाळांत सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरु करण्यात येत असून त्या संबंधित प्रवेशप्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय पालिका शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. या प्रवेशप्रक्रियेची कार्यवाही ऑनलाईन होणार असून लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यानंतर गुगल फॉर्म पालकांकडून भरून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सुरु होणाऱ्या पालिका शिक्षण विभागाच्या आयसीएसई व सीबीएसई मंडळाच्या शाळांतील प्रवेशप्रक्रिया या लॉकडाऊन काळात ही ऑनलाईन पद्धतीने मार्गी लागण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेच्या प्रायोगिक तत्त्वारील पूनम नगर येथील सीबीएसई आणि वूलन मिल येथील आयसीएसई शाळा अनुक्रमे एप्रिल २०२० आणि जून २०२० पासून सुरु होणार होत्या त्यासाठीची प्रवेश अर्ज प्रक्रिया आज २७ फेब्रुवारीपासून सुरुही झाली.२६ मार्च ते २८ मार्चच्या दरम्यान प्रवेश प्रक्रियेसाठी सोडतीचे नियोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर पालिका प्रशासनातर्फे ही प्रवेशप्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे होते. या प्रवेशप्रक्रियेची पुढील छाननी प्रक्रिया २७ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करून पात्र अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत.३० एप्रिल रोजी मोठया स्क्रीनवर ऑनलाईन पद्धतीने पात्र अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या जाहीर करून लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या वर्गासाठी / इयत्तेसाठी ३८ हून अधिक अर्ज आले असतील त्याच इयत्तांसाठी लॉटरी पद्धती राबविली जाणार आहे. १० मे पर्यंत पालकांना गुगल फॉर्म भरून आपल्या प्रवेशाची निश्चिती करायची आहे. याच कालावधीत ज्या इयत्तांसाठी लॉटरी पद्धती राबविण्यात आली नाही त्या पालकांकडूनही गुगल फॉर्मभरून प्रवेश निश्चिती करून घेतली जाणार आहे.लॉटरीवेळी सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळले जाणार : लॉटरी पद्धती राबविली जाताना सोशल डिस्टंसिन्गच्या नियमांचे आणि पालन करण्यात यावे अशा सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत. लॉटरी काढतेवेळी शाळांनी २ विद्यार्थी आणि २ पालक याना उपस्थित राहण्याची विनंती करावी आणि त्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करावी असेही निर्देशित केले आहे.