महापालिकेच्या शाळांत आता लवकरच ‘सीबीएसई पॅटर्न’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:43 AM2020-01-22T03:43:55+5:302020-01-22T03:44:27+5:30

पालिका शाळांची ओळख केवळ राज्य शिक्षण मंडळाचे शिक्षण देणा-या शाळा म्हणून न राहता केंद्रीय मंडळांच्या शाळांचाही त्यात अंतर्भाव असणार आहे.

CBSE pattern in Mumbai municipal schools soon | महापालिकेच्या शाळांत आता लवकरच ‘सीबीएसई पॅटर्न’

महापालिकेच्या शाळांत आता लवकरच ‘सीबीएसई पॅटर्न’

Next

मुंबई : सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या शाळांकडील शहरी पालकांचा ओढा लक्षात घेऊन आता मुंबई महापालिकेतही या केंद्रीय मंडळाच्या शाळा सुरू होणार असून मंगळवारी झालेल्या पालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे इतर पालिका शाळांप्रमाणे या शाळांमधील प्रवास आणि शिक्षण विनामूल्य असणार असून या उपक्रमासाठी, आयसीएसई व सीबीएसई मंडळांची मान्यता आवश्यक असल्याने त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे. आता पालिका शाळांची ओळख केवळ राज्य शिक्षण मंडळाचे शिक्षण देणा-या शाळा म्हणून न राहता केंद्रीय मंडळांच्या शाळांचाही त्यात अंतर्भाव असणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, तसेच इतर मंडळांच्या शाळांचा पर्याय खुला व्हावा, या उद्देशाने पालिकेने एक सीबीएसई आणि एक आयसीएसई शाळा सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी १३ सप्टेंबरच्या शिक्षण समितीच्या बैठकीत यासंबंधी प्रस्तावही मांडला होता. शिक्षण समितीच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मनपा आयुक्तांच्या अभिप्रायासाठी तो पाठविण्यात आला आहे. मनपा आयुक्तांच्याही सकारात्मक प्रतिसादानंतर अखेर मंगळवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

या प्रस्तावाला मिळालेल्या मंजुरीनंतर प्रायोगिक तत्त्वावर वूलन मिल मनपा शाळा येथे आयसीएसई मंडळाची तर जोगेश्वरी पूर्वमधील पूनमनगर येथील मनपा शाळा येथे सीबीएसई मंडळाचे ज्युनिअर आणि सिनिअर केजी, इयत्ता १ली ते ६ वीचे वर्ग, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती युवासेनेचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी दिली.

काळाची गरज ओळखून सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षण आपल्या पाल्यांना मिळावे, असे पालकांना वाटते. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी, नाइलाजाने आर्थिक बोजा सहन करूनही, पालक खासगी सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळांकडे वळताना दिसतात. तेच शिक्षण त्यांना विनामूल्य पालिका शाळांत मिळाले तर नक्कीच पालिका शाळांतील विद्यार्थी गळती थांबेलच शिवाय खासगी शाळांकडून होणारी पालकांची लूटही थांबण्यास मदत होईल.
- साईनाथ दुर्गे,
शिक्षण समिती सदस्य, युवासेना

Web Title: CBSE pattern in Mumbai municipal schools soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.