Join us

सीबीएसईचा बारावी परीक्षा मूल्यांकनाचा फॉर्म्युला अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:06 AM

अभ्यासकांचे मत; राज्य शिक्षण मंडळाने अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीबीएसई मंडळ बारावीच्या रद्द केलेल्या ...

अभ्यासकांचे मत; राज्य शिक्षण मंडळाने अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सीबीएसई मंडळ बारावीच्या रद्द केलेल्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी ३०:३०:४० हे धोरण वापरून अंतर्गत मूल्यमापन करणार आहे. यासाठी दहावीचे ३०%, अकरावीचे ३०% आणि बारावीतले ४०% गुण विचारात घेतले जाणार आहेत. मात्र सीबीएसई मंडळाचा बारावीचा निश्चित अभ्यासक्रम असताना दहावी आणि अकरावीच्या गुणांवर त्यांचे मूल्यमापन करणे अयोग्य आहे. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानच होणार आहे. यामुळे किमान राज्य मंडळाने तरी या धोरणावर अवलंबून न राहता बारावी मूल्यांकनासाठी वेगळ्या सूत्राचा विचार करावा अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.

दहावीच्या परीक्षांच्या वेळी सीबीएसईचे अनुकरण करत राज्य मंडळाने ऐनवेळी परीक्षा रद्द केल्या आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावण्याचा निर्णय घेतला. आता ही सीबीएसई मंडळाच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनासाठी ही याच धोरणाचा अवलंब केला जाण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करत आहेत.

अकरावीच्या बाबतीत मागील वर्षभरात शाळा-महाविद्यालये चालू होती का? मग विद्यार्थ्यांचे कसे आणि काय मूल्यमापन झाले असेल यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे. त्यामुळे अकरावीच्या वर्गातील निकालाचे ३० टक्के गुण बारावीच्या निकालात ग्राह्य धरणे कितपत योग्य आहे, असा सवाल शिक्षण अभ्यासक धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागील वर्षांच्या अभ्यासाचा आढाव घेऊन त्यांना भविष्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे त्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते असे मत त्यांनी मांडले आहे.

विद्यार्थी पालकांना मूल्यांकनाच्या धोरणाची प्रतीक्षा

सीबीएसई मंडळाकडून बारावी मूल्यांकनाच्या फॉर्म्युला जाहीर झाला तरी राज्य शिक्षण मंडळाकडून याबाबत काहीच निर्णय घेतला गेला नसल्याने विद्यार्थी आणि पालक धोरण जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहेत. निकालाचे धोरण अस्पष्ट असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांना द्यायच्या प्रवेश परीक्षा द्यायच्या का? तयारी कशी करावी? निकाल कसा लागेल असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभे राहिल्याने त्यांची चिंता वाढू लागली आहे.