लोकलमधील महिला डब्याला टॉकबॅकसह CCTV चं कवच; मध्य रेल्वेवर जूनअखेरपर्यंत यंत्रणा बसविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 09:30 AM2024-04-24T09:30:03+5:302024-04-24T09:30:35+5:30
दोन्ही मार्गांवर उशिराच्या प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा गरजेचे होती.
मुंबई : लोकलमधून रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने लोकलच्या प्रत्येक महिला डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्यावर भर दिला आहे. जूनअखेरपर्यंत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमधील प्रत्येक महिला डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा लागणार आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलच्या महिला डब्यात सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस तैनात करण्यात येत असले तरी या सुरक्षा यंत्रणेला आधुनिकतेची जोड द्यावी, यावर महिला प्रवाशांकडून सातत्याने भर देण्यात आला होता. रेल्वे प्रवासी संघटनांकडूनही लोकलमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात यावी, यावर भर देण्यात आला होता. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावर प्रत्येक स्थानकावर पोलिस तैनात असले तरी दोन्ही मार्गांवर उशिराच्या प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा गरजेचे होती. त्यानुसार, महिला डब्यात सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला जात आहे.
- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मिळून ७७१ महिला डब्यांपैकी ५९४ डब्यात टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात आली आहे.
- एखाद्या महिला डब्यात आग लागली किंवा दुर्घटना घडली तर महिला प्रवाशांना या यंत्रणेद्वारे घटनेची माहिती मोटरमनला देता येत आहे.
- ३० जूनपर्यंत उर्वरित महिला डब्यातही टॉकबॅक यंत्रणा बसविली जाणार आहे.
- ७७१ महिला डब्यांपैकी ६०६ डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. उर्वरित महिला डब्यात ३० मेपर्यंत सीसीटीव्ही लावण्यात येतील.
- मध्य - हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलच्या प्रत्येक महिला डब्यात दीड वर्षांपासून सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे.