मुंबई : महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी लोकलमधील गार्ड आणि मोटरमनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण पाहता येणारे टीव्ही बसविण्याचा विचार केला जात आहे. मात्र हे चित्रण मोटरमनऐवजी फक्त गार्डलाच पाहता येणार असल्याचे पश्चिम रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आणि त्याची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आणखी तीन लोकलमधील नऊ महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले. एकूण १७ लोकलमधील ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर त्याचे नियंत्रण रेल्वे सुरक्षा दलाकडे असले तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण गार्डलाही पाहता यावे यावर विचार केला जात असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. परंतु सुरक्षिततेच्या नावावर डब्यातून प्रवास करताना महिला प्रवाशांवर अशा प्रकारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याने यावर टीकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
गार्डला दिसणार सीसीटीव्ही चित्रण?
By admin | Published: February 10, 2016 4:34 AM