मारहाण झाली सीसीटीव्हीत कैद
By admin | Published: September 12, 2015 03:53 AM2015-09-12T03:53:37+5:302015-09-12T03:53:37+5:30
किरकोळ कारणावरून चिंतामणी कदम (५१) या एमएमआरडीएच्या कंत्राटदाराला १० ते १५ जणांनी ६ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास बेदम मारहाण केली. हा प्रसंग
मुंबई : किरकोळ कारणावरून चिंतामणी कदम (५१) या एमएमआरडीएच्या कंत्राटदाराला १० ते १५ जणांनी ६ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास बेदम मारहाण केली. हा प्रसंग कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळील महर्षी कर्वे नगर परिसरात घडला. घटनेनंतर लगेचच कदम यांचे नातेवाईक मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रण घेऊन कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात धडकले. मात्र पोलिसांनी चित्रण न बघता फक्त एकाच आरोपीविरोधात थातूरमातूर गुन्हा नोंदवला. अखेर ही बाब वरिष्ठांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात हत्येचा प्रयत्न, दंगल आदी महत्त्वाचे गुन्हे सहभागी करून घेतले.
प्रकल्पग्रस्तांसाठी एमएमआरडीएने कांजूर (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळ इमारती उभारल्या आहेत. मारहाण झालेले कदम हे तेथील सहा सोसायट्यांच्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ६ सप्टेंबरला रात्री कदम यांच्या रायगड सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरच प्रकाश येवले (५८) नावाची व्यक्ती लघवी करत होती. ते पाहून कदम यांनी येवलेंना हटकले. तेव्हा येवलेंनी कदम यांना शिवीगाळ केली. हा प्रसंग तेथेच संपवून कदम इमारतीच्या आवारात बसले होते. काही वेळाने येवले यांचा मुलगा नीलेश आपल्या अन्य दहा ते पंधरा साथीदारांना सोबत घेऊन तेथे आला. या जमावाने कदम यांना घेरले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत कदम गंभीररीत्या जखमी झाले व बेशुद्ध पडले. त्यांना उपचारार्थ गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वडिलांना मारहाण झाल्याचे समजताच बाहेर आलेल्या कदम यांच्या मुलीलाही नीलेशने मारहाण केली. हा संपूर्ण प्रसंग इमारतीबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला.
सीसीटीव्हीचे चित्रण सोबत घेऊनच कदम यांच्या कन्येने कांजूरमार्ग पोलीस ठाणे गाठले. तिने पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही चित्रण दाखविले, नीलेशव्यतिरिक्त हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची नावे सांगितली. मात्र पोलिसांनी चित्रण न पाहता फक्त नीलेशविरोधात मारहाण व विनयभंग या कलमान्वये गुन्हा नोंदविला. नीलेशला रात्रीच अटक करण्यात आली. मात्र गुन्हा किरकोळ असल्याने त्याला दुसऱ्या दिवशी न्यायालयाने जामिनावर सोडले.
यामुळे संतप्त झालेले कर्वे नगरचे रहिवासी व कदम यांच्या नातेवाइकांनी परिमंडळ ७चे उपायुक्त विनय राठोड यांची भेट घेतली. राठोड यांनी मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रण पाहून कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजिनाथ सातपुते यांना चित्रण पाहून योग्य ती कारवाई करण्याची ताकीद दिली.
सीसीटीव्ही चित्रण पाहिल्यानंतर नीलेशविरोधात नोंदविलेल्या गुन्ह्यात हत्येचा प्रयत्न, दंगल आदी कलमे सहभागी करून घेतली. कदम यांच्या नातेवाइकांनी सादर केलेले सीसीटीव्ही चित्रण हा या गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे हे चित्रण रेकॉर्डवर घेतले आहे, असे सातपुते यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेले नीलेशचे वडील प्रकाश येवले आणि अन्य अनोळखी आरोपींविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती सातपुते यांनी ‘लोकमत’ला दिली. आम्ही प्रकाश यांना अटक केली आहे. अन्य आरोपींवरही लवकरच कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)