सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी
By admin | Published: January 7, 2016 01:04 AM2016-01-07T01:04:56+5:302016-01-07T01:04:56+5:30
गोरेगाव येथे गेल्या आठवड्यात मालकाच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या सुफिया खातून या मोलकरणीच्या मृत्यूच्या
मुंबई : गोरेगाव येथे गेल्या आठवड्यात मालकाच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या सुफिया खातून या मोलकरणीच्या मृत्यूच्या चौकशीप्रकरणी सध्या पोलीस तिच्या मोबाइलचा सीडीआर (कॉल डाटा रेकॉर्ड) तसेच सीसीटीव्ही फुटेज पडताळत आहेत.
गोरेगाव ढ़पश्चिम) येथील गार्डन इस्टेट इमारतीत २0३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुफियाच्या मोबाइलचे सीडीआर मिळविले आहे. मृत्यूपूर्वी ती कोणाकोणाच्या संपर्कात होती, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक सुधाकर गवस यांनी सांगितले. तसेच इमारतीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीदेखील पडताळणी सुरू आहे. या फुटेजनुसार खातून दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान इमारतीत दाखल झाल्याचे दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ती ज्या कपड्यांमध्ये आली होती, त्याच ओढणीने तिने गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकांकडेही चौकशी करण्यात आल्याचे गवस यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजनुसार इमारतीच्या गेटमधून कोण आत जाते, इतकीच माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे, मात्र त्यानंतर कोण कुठल्या फ्लॅटमध्ये जाते, हा तपशील आम्ही देऊ शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
खातूनचा मृतदेह अंत्यविधीसाठी कोलकात्याला नेण्यात आला आहे. त्यामुळे नातेवाइकांचे जबाब नोंदविणे अद्याप बाकी आहे. खातूनचे मनाविरुद्ध लग्न ठरविण्यात आल्याने तिने हे पाऊल उचलले असावे का, याचीही माहिती पोलीस तिच्या पालकांकडून घेणार आहेत. दरम्यान, तिच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा बांगूरनगर पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)