पेंग्विनच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पर्यटकसंख्या वाढल्याने निर्णय, राणीच्या बागेत तिसरा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 07:01 AM2017-09-12T07:01:37+5:302017-09-12T07:02:06+5:30
भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेत परदेशी पाहुण्यांच्या आगमनानुळे पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र आधीच तीन पाळ्यांत ७० कामगार राणीबागेत देखरेखीसाठी तैनात आहेत. परंतु हा वॉच चौफेर राहण्यासाठी महापालिकेने ५३ एकर असलेल्या या जागेत तीनशे सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेत परदेशी पाहुण्यांच्या आगमनानुळे पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र आधीच तीन पाळ्यांत ७० कामगार राणीबागेत देखरेखीसाठी तैनात आहेत. परंतु हा वॉच चौफेर राहण्यासाठी महापालिकेने ५३ एकर असलेल्या या जागेत तीनशे सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल पाच कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात राणीबागेत सात पेंग्विन आणण्यात आले. तेव्हापासून पेंग्विन मुंबईचे आकर्षण ठरले आहे. गेल्या महिन्यात पेंग्विन दर्शन व राणीबागेतील प्रवेश शुल्क वाढविण्यात आले आहे. आतापर्यंत प्रौढांसाठी पाच तर १२ वर्षांखालील मुलांसाठी दोन रुपये आकारण्यात येत होते. यामध्ये वाढ करून आई-वडील व दोन मुलांचा समावेश असलेल्या कुटुंबासाठी १०० रुपये दर आकारण्यास सुरुवात झाली आहे. तरीही आॅगस्ट महिन्यात ७६ हजार ९४४ पर्यटक राणीबागेत आल्याचा पालिकेचा दावा आहे.
गैरवर्तन, चोरट्यांवर वॉच
राणीच्या बागेतील सुरक्षा तोकडी पडत असून, अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याची गरज प्रशासनाला भासत आहे. त्यानुसार पर्यटकांचे गैरवर्तन, चोरीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. याचे नियंत्रण कक्ष पेंग्विन असलेल्या इमारतीच्या दुसºया मजल्यावर असेल. यामध्ये झूम करून लांबचे दृश्य पाहणे तसेच रात्रीच्या वेळेतही बारीक हालचाली टिपण्याची सुविधा आहे. दोन वर्षांपूर्वी एका सुरक्षा रक्षकाने राणीबागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील शोभेच्या दागिन्यांची चोरी केली होती. अशा घटनांवरही नजर ठेवणे आता शक्य होणार आहे.