पालिकेच्या प्रसूतिगृहांवर ‘सीसीटीव्ही’चा वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:50 AM2018-12-27T04:50:17+5:302018-12-27T04:50:25+5:30
महापालिकेच्या रुग्णालयातून मुले चोरी जाण्याचे काही प्रकार यापूर्वी घडले आहेत. काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयातून मुले चोरी जाण्याचे काही प्रकार यापूर्वी घडले आहेत. काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र, अशा घटना प्रसूतिगृहांमध्येही घडण्याचा धोका असल्याने, त्या ठिकाणी कडक सुरक्षा यंत्रणा असावी, अशी मागणी वारंवार होत असते. त्यानुसार, महापालिकेच्या १४ प्रसूतिगृहांमध्ये १३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेच्या रुग्णालयातील दररोज हजारो रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येत असतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, त्या तुलनेत सुरक्षा यंत्रणा तोकडी पडत आहे. पालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची संख्या पाहता, रुग्णालयांत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन पालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
गेल्या हिवाळी अधिवेशनात पालिकेच्या अख्यारितील प्रसूतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार, बसविण्यात येणाºया या कॅमेºयामध्ये ७८ डोम कॅमेरे, ४६ बुलेट कॅमेरे व ११ पी.टी. झेड कॅमेरे अशा एकूण १३५ सीसीटीव्ही कॅमेºयांची यंत्रणा उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी दोन कोटी ५८ लाख ९६ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये अनेकदा मूल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रसूतिगृहांमध्ये सीसीटीव्ही असावेत, असा ठराव पालिकेच्या स्थायी समितीत मांडला होता.
ही ठरावाची सूचना पालिकेने मान्य केली असून, याबाबतचा अभिप्राय पाठविला आहे. त्यानुसार, आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या वर्षभरात सर्व प्रसूतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे लागतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी सांगितले.